‘स्ट्राँग वुमन ऑफ इंटरनॅशनल’ किताबावर मोहोर; मास्टर वन महिला गटात मानाचा चषक पटकावला
अहिल्यानगरच्या कन्येने आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उंचावला देशासह शहराचा नावलौकिक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सावेडी परिसरातील अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या आमंत्रित आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले. महिलांच्या मास्टर वन विभागात दमदार कामगिरी करत त्यांनी ‘स्ट्राँग वुमन ऑफ इंटरनॅशनल’ हा मानाचा किताब आणि चषक पटकावला. त्यांच्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अहिल्यानगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
श्रीलंका सरकार आणि संयुक्त भारतीय खेळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल 120 देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविल्याने स्पर्धेला मोठे आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले होते. विविध देशांतील बलाढ्य खेळाडूंच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत अनुराधा मिश्रा यांनी आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.
पॉवरलिफ्टिंगमधील तीन प्रमुख प्रकारांमध्ये अनुराधा मिश्रा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी स्क्वॉटमध्ये 150 किलो, बेंच प्रेसमध्ये 110 किलो आणि डेडलिफ्टमध्ये 180 किलो, असे एकूण 440 किलो वजन उचलले. प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात एवढे वजन उचलत त्यांनी आपल्या शारीरिक सामर्थ्यासोबतच तांत्रिक कौशल्य, सातत्य आणि मानसिक तयारीचे दर्शन घडविले.
मास्टर वन महिला विभागात त्यांनी केलेल्या या दमदार कामगिरीची दखल घेत त्यांना ‘स्ट्राँग वुमन ऑफ इंटरनॅशनल’ या मानाच्या किताबाने गौरविण्यात आले. या यशाबद्दल त्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीलंकेच्या पश्चिम प्रांताचे माजी मुख्यमंत्री इसरु देवप्रिय पेरोरा यांच्या हस्ते अनुराधा मिश्रा यांना हा चषक प्रदान करण्यात आला.
अनुराधा मिश्रा यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा पहिलाच मोठा पराक्रम नसून, यापूर्वी त्यांनी भूतान येथे झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई करत आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळणाऱ्या यशामुळे अनुराधा मिश्रा या भारतीय महिला पॉवरलिफ्टिंग क्षेत्रातील प्रभावी खेळाडू म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या या यशामागे महाराष्ट्राचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे आणि राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मिश्रा या अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरातील ‘जिम स्ट्राईकर’ येथे प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

