सेंट मायकल स्कूलची दुहेरी विजयी आगेकूच
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि. 18 ऑगस्ट) अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळाला. 12 वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट मायकल स्कूलने आयकॉन पब्लिक स्कूलचा 1-0 असा पराभव करत विजयी आगेकूच केली. तर 14 वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट मायकल स्कूलने आर्मी पब्लिक स्कूलला टायब्रेकरमध्ये 4-3 असे नमवत आणखी एक दिमाखदार विजय नोंदविला. विशेष म्हणजे, दोन्ही सामन्यांत सेंट मायकलच्या खेळाडूंनी निर्णायक क्षणी केलेल्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळवून दिला.
12 वर्षांखालील मुलांच्या गटातील आयकॉन पब्लिक स्कूल आणि सेंट मायकल स्कूल यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात वारंवार धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मैदानावर प्रत्येक क्षणी उत्कंठा निर्माण झाली होती. सेंट मायकल स्कूलकडून 19 व्या मिनिटाला नावील याने अचूक गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोल झाल्यानंतर आयकॉन पब्लिक स्कूलने सामन्यात बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. आयकॉनच्या खेळाडूंनी सेंट मायकलच्या गोलक्षेत्रात आक्रमणे केली; मात्र सेंट मायकलच्या भक्कम बचावफळीने प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला.
उत्तरार्धातही आयकॉन स्कूलने गोल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र सेंट मायकलच्या बचावपटूंनी संयमी खेळ करत आघाडी कायम राखली. अखेर निर्धारित वेळेत आयकॉनला गोल करण्यात अपयश आले आणि सेंट मायकल स्कूलने 1-0 असा विजय मिळविला. नावील 19 व्या मिनिटाला केलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि सेंट मायकल स्कूल यांच्यातील सामना अत्यंत अटीतटीचा झाला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्यावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मैदानावरील सामना पाहण्यासाठी उपस्थित फुटबॉलप्रेमींमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती. सेंट मायकल स्कूलकडून 12 व्या मिनिटाला ऋषी याने गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र आर्मी पब्लिक स्कूलने हार न मानता आक्रमण तीव्र केले. त्याचा परिणाम म्हणून 15 व्या मिनिटाला दिग्विजय याने गोल करत आर्मी पब्लिक स्कूलला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
यानंतर दोन्ही संघांनी आघाडी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या; मात्र दोन्ही संघांच्या बचावफळीने त्या निष्फळ ठरवल्या. निर्धारित वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ 1-1 गोलने बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर निश्चित करण्यात आला. टायब्रेकरमध्येही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कौशल्य आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले. आर्मी पब्लिक स्कूलकडून प्रथम गव्हाणे, अजय सांगळे आणि साई खाडे यांनी प्रत्येकी एक गोल करत एकूण तीन गोल केले. दुसरीकडे सेंट मायकल स्कूलकडून विधान, अनीश, ऋषी आणि इशान पठारे यांनी प्रत्येकी एक गोल करत चार गोलांची नोंद केली. अखेर टायब्रेकरमध्ये सेंट मायकल स्कूलने आर्मी पब्लिक स्कूलवर 4-3 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत बाजी मारली.

