मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल अंतिम फेरीत
गोलांचा वर्षाव, पेनल्टी शूटआऊटचा थरार; मुलींच्या गटातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध प्रवरा पब्लिक स्कूल असा रंगणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या गुरुवारी (दि. 13 ऑगस्ट) झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य आणि बचावात्मक खेळाचे दर्शन घडविले. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर मुलींच्या 16 वर्षांखालील गटाची उपांत्य फेरी, तसेच मुलांच्या 12, 14 आणि 16 वर्षांखालील गटातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगले. काही सामने एकतर्फी झाले, तर आठरे पाटील पब्लिक स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूल यांच्यातील 14 वर्षांखालील सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगला. दरम्यान, प्रवरा पब्लिक स्कूलने मुलांच्या विविध वयोगटांत दमदार विजय मिळवत आपली आगेकूच कायम ठेवली. मुलींच्या 16 वर्षांखालील गटात प्रवरा पब्लिक स्कूलने श्री साई स्कूलचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील पब्लिक स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूल यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत एकमेकांच्या गोलपोस्टवर चढाया केल्या. मात्र, निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे सामना 0-0 गोलने बरोबरीत राहिला. यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लावण्यात आला. आठरे पाटील पब्लिक स्कूलकडून वेदांत, खेसे आणि अलख यांनी प्रत्येकी 1 गोल केला. आर्मी पब्लिक स्कूलकडून राजवीर याने 1 गोल केला. अखेर आठरे पाटील पब्लिक स्कूलने पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 गोलने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.
16 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील पब्लिक स्कूलने आर्मी पब्लिक स्कूलवर 3-0 गोलने मात केली. आठरे पाटील स्कूलकडून ओम लोखंडे याने 31 व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर त्यानेच 38 व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाची आघाडी भक्कम केली. 58 व्या मिनिटाला धैर्य कळमकर याने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आर्मी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र आठरे पाटीलच्या बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. अखेर आठरे पाटील पब्लिक स्कूलने 3-0 गोलने दणदणीत विजय मिळवला.
12 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील पब्लिक स्कूल आणि श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात सामना झाला. या सामन्यात आठरे पाटील स्कूलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. आठरे पाटीलकडून साईराज तागड याने 12 व्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर अभिमन्यू चंदन याने 16 व्या, 30 व्या आणि 35 व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली. आराध्य म्हस्के याने 17 व्या मिनीटाला 1 गोल केला. प्रतिस्पर्धी श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलला एकही गोल करता आला नाही. अखेर आठरे पाटील पब्लिक स्कूलने 5-0 गोलने एकतर्फी विजय मिळवला.
12 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल आणि तक्षिला स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात प्रवरा स्कूलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. प्रवरा स्कूलकडून कौस्तुभ तांबे याने 10 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कुणाल खाडे याने 15 व्या मिनिटाला गोल करत आघाडी 2-0 अशी केली. तक्षिला स्कूलच्या खेळाडूंनी बचावात्मक खेळ करत गोल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, प्रवरा स्कूलच्या भक्कम बचावामुळे त्यांना एकही गोल करता आला नाही. अखेर प्रवरा पब्लिक स्कूलने 2-0 गोलने विजय मिळवला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूलने तक्षिला स्कूलचा 4-0 गोलने पराभव केला. प्रवरा स्कूलकडून मोहित चौधरी याने तिसऱ्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर वैभव कविटकर याने सहाव्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी वाढवली. प्रवरा स्कूलचा आक्रमक खेळ पुढेही कायम राहिला. ओमकार कामडी याने 30 व्या मिनिटाला, तर युवराज आहेर याने 37 व्या मिनिटाला गोल केला. अखेर प्रवरा पब्लिक स्कूलने 4-0 गोलने दणदणीत विजय मिळवला.
16 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल आणि सेंट मायकल स्कूल यांच्यातील सामन्यात प्रवरा स्कूलने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. प्रवरा स्कूलकडून रामचंद्र पालवे याने 17 व्या, 46 व्या आणि 49 व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली. मयुर पाटील याने 32 व्या आणि 44 व्या मिनिटाला गोल करत संघाच्या आघाडीत भर घातली. अभिनव राऊत याने 42 व्या मिनिटाला गोल केला. प्रवरा स्कूलच्या आक्रमक खेळापुढे सेंट मायकल स्कूलचा बचाव निष्प्रभ ठरला. अखेर प्रवरा पब्लिक स्कूलने 6-0 गोलने एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
–
मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल अंतिम फेरीत
मुलींच्या 16 वर्षांखालील गटातील उपांत्य फेरीचा सामना प्रवरा पब्लिक स्कूल आणि श्री साई स्कूल यांच्यात रोमहर्षक झाला. प्रवरा पब्लिक स्कूलकडून मयुरी कोल्हे हिने दुसऱ्या आणि 9 व्या मिनिटाला गोल करत संघाला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. श्री साई स्कूलकडून हृद्या तडके हिने 14 व्या मिनिटाला गोल करून सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. प्रवरा स्कूलने प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवत 39 व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. अखेर प्रवरा पब्लिक स्कूलने 3-0 गोलने विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
आता मुलींच्या गटातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध प्रवरा पब्लिक स्कूल असा रंगणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये प्रवरा पब्लिक स्कूलने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

