• Thu. Aug 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

वारस हक्काची नियुक्ती रखडली; सफाई कर्मचारी संघटनेचा आक्रमक पवित्रा

ByMirror

Aug 13, 2026

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस हक्काने नियुक्ती आदेश देण्याची मागणी


15 ऑगस्टला मयताच्या पत्नीचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहनाचा इशारा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस हक्काने नियुक्ती आदेश देण्यात यावा, तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रलंबित प्रश्‍नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कै. श्‍याम अमीर बिवाल यांच्या पत्नी शिलाबाई बिवाल यांनीही आपल्या प्रलंबित नोकरीच्या प्रश्‍नावर तीव्र भूमिका घेतली आहे. 1984 पासून प्रलंबित असलेल्या नोकरीच्या आदेशाबाबत तातडीने निर्णय न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रशासनाने या मागणीवर तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमधील सफाई कर्मचारी तसेच संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून 18 ऑगस्ट रोजी राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर ‘भव्य झाडू आंदोलन’ करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


राहुरी नगरपरिषदेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले कै. श्‍याम अमीर बिवाल यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर लाड-पागे समितीच्या धोरणानुसार वारस हक्काने सौ. ज्योती मनीष सोलंकी यांचे नाव नामनिर्देशित करण्यात आले आहे. नियुक्तीसाठी आवश्‍यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता वारसांकडून यापूर्वीच करण्यात आली असल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करूनही अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आलेला नसल्याने बिवाल कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.


सफाई कर्मचारी कुटुंबातील वारसाला शासनाच्या धोरणानुसार हक्काची नोकरी मिळणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून नियुक्ती आदेश देण्यास विलंब होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. रोजगाराच्या हक्कासाठी संबंधित कुटुंबाला वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेने आपल्या निवेदनात लाड-पागे समितीच्या नियमानुसार सौ. ज्योती मनीष सोलंकी यांना सफाई कर्मचारी पदावर वारस हक्काने तात्काळ नियुक्ती आदेश पारित करण्याची मागणी केली आहे. हा प्रश्‍न केवळ एका कुटुंबाच्या रोजगाराचा नसून सफाई कामगारांच्या वारसांच्या हक्काशी संबंधित असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *