प्रवरा पब्लिक स्कूलचा तीन सामन्यांत दमदार खेळ; सेंट मायकल स्कूलचीही विजयी आगेकूच
गुरुवार पासून मुलांचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी (दि. 12 ऑगस्ट) फुटबॉलप्रेमींना चुरशीच्या सामन्यांचा थरार अनुभवायला मिळाला. फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत विविध वयोगटांतील संघांनी मैदानावर कौशल्य, वेग आणि आक्रमक खेळाचे दर्शन घडविले. एका बाजूला प्रवरा पब्लिक स्कूलने प्रतिस्पर्ध्यांवर गोलचा वर्षाव करीत दमदार विजय मिळविले, तर सेंट मायकल स्कूलनेही प्रभावी कामगिरी करत विजयी आगेकूच केली. दरम्यान, 16 वर्षांखालील मुलींच्या उपांत्य सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने पोदार स्कूलचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. तर गुरुवार (दि.13 ऑगस्ट) पासून मुलांच्या गटातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने नॉक आऊट पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. यामध्ये पराभव झालेला संघ स्पर्धेतून बाहेर होणार आहे.
सकाळच्या सत्रात 12 वर्षांखालील मुलांच्या गटात सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि प्रवरा पब्लिक स्कूल यांच्यात सामना झाला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या प्रवरा पब्लिक स्कूलने सामन्यावर वर्चस्व राखत 6-1 गोलने दणदणीत विजय मिळविला. प्रवरा पब्लिक स्कूलकडून प्रिन्स चंदन याने सामन्याच्या 5व्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर त्यानेच 9व्या आणि 29व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदविली. वरद चौहान याने 8व्या मिनिटाला गोल केला. कुणाल खाडे याने 25व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी आणखी भक्कम केली. सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलकडून समीर खान याने 32व्या मिनिटाला एकमेव गोल केला. त्यानंतर शेख याने 42व्या मिनिटाला स्वयंगोल केल्याने प्रवरा पब्लिक स्कूलच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
14 वर्षांखालील मुलांच्या गटातही सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि प्रवरा पब्लिक स्कूल आमनेसामने आले. या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्याची संधी दिली नाही. अखेर प्रवरा पब्लिक स्कूलने 6-0 गोलने एकहाती विजय संपादन केला. मोहित चौधरी, वैभव कोटेकर, धीरज चारसकर व रोशन पवार याने प्रत्येकी 1 गोल केला. तर युवराज आहेर याने 2 गोल केले.
16 वर्षांखालील मुलांच्या गटातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल विरुद्ध प्रवरा पब्लिक स्कूल हा सामना मात्र अत्यंत अटीतटीचा झाला. दोन्ही संघांनी बचाव आणि आक्रमणाचा सुरेख समतोल साधत सामन्यात रंगत आणली. दुसऱ्या हाफमध्ये सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटकडून माहिर गुंदेचा याने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र प्रवरा पब्लिक स्कूलकडून प्रविण काळे याने 49व्या मिनिटाला गोल करून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांनी निर्णायक गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र शेवटपर्यंत कोणत्याही संघाला आघाडी घेता आली नाही. अखेर सामना 1-1 गोलने बरोबरीत सुटला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट मायकल स्कूल आणि ऑर्किड स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात सेंट मायकल स्कूलने मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले. सेंट मायकलने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत ऑर्किड स्कूलचा 7-0 गोलने एकतर्फी पराभव केला. सेंट मायकल स्कूलकडून शौर्य चंगेडिया याने 11व्या, 35व्या आणि 36व्या मिनिटाला गोल करून हॅट्ट्रिक नोंदविली. ऋषी पाटोळे याने 42व्या आणि 46व्या मिनिटाला दोन गोल केले. त्यानंतर नमीत फिरोदिया याने 49व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात भर घातली.
16 वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट मायकल स्कूल आणि ऑर्किड स्कूल यांच्यात सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच सेंट मायकल स्कूलने आघाडी घेतली. नमन दिवाणे याने अवघ्या दुसऱ्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. पहिल्याच गोलनंतर सेंट मायकलच्या खेळाडूंनी बचावात्मक खेळीवर भर देत ऑर्किड स्कूलच्या आक्रमणाला रोखून धरले. ऑर्किड स्कूलला एकही गोल करता न आल्याने अखेर सेंट मायकल स्कूलने 1-0 गोलने विजय मिळविला.
–—
आर्मी पब्लिक स्कूल मुलींच्या अंतिम फेरीत
16 वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीचा सामना आर्मी पब्लिक स्कूल आणि पोदार स्कूल यांच्यात झाला. या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत सामन्यावर पकड निर्माण केली. सिद्धी हिने 14व्या मिनिटाला गोल करून आर्मी पब्लिक स्कूलचे खाते उघडले. त्यानंतर प्रांजल हिने 22व्या आणि 35व्या मिनिटाला सलग दोन गोल करून संघाची आघाडी भक्कम केली. पोदार स्कूलला एकही गोल करता न आल्याने आर्मी पब्लिक स्कूलने 3-0 गोलने विजय मिळवून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

