बालकांच्या हक्कांसाठी ‘राष्ट्रीय बाल धारणालय हक्क सत्याग्रह’
‘सक्ती बालकावर नाही, कर्तव्याची सक्ती शासनावर असावी -ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशातील प्रत्येक बालकाला जन्मापासून 18 वर्षांपर्यंत पौष्टिक आहार, आरोग्य, व्यायाम, गुणवत्तापूर्ण शिक्षण, ज्ञान, विवेक आणि जीवनोपयोगी कौशल्यांची समान संधी मिळावी, तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, या मागणीसाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने ‘राष्ट्रीय बाल धारणालय हक्क सत्याग्रह’ जाहीर करण्यात आला आहे.
या आंदोलनाची पहिली जनजागृती व प्रत्यक्ष कृती मोहीम 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे होणार आहे. ‘सक्ती बालकावर नाही, बालक घडविण्याच्या कर्तव्याची सक्ती शासनावर!’ हा आंदोलनाचा मूलमंत्र आहे. बालकांचा विकास केवळ परीक्षा, गुण आणि घोकंपट्टीपुरता मर्यादित न ठेवता त्यांचे आरोग्य, ज्ञान, विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन, निर्णयक्षमता आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित होणे आवश्यक आहे. या उद्देशाने संघटनांनी पाच सूत्रांचा कृतीशील आराखडा मांडला आहे.
यामध्ये जन्मापासून 18 वर्षांपर्यंतच्या बालकांच्या पोषण, आरोग्य, शिक्षण व कौशल्यविकासाची नोंद ठेवणारे एकात्मिक बाल आरोग्य व ज्ञान कार्ड, शाळांमध्ये विवेक व कौशल्य केंद्रे, ‘शून्य कुपोषण-शून्य वंचितता’ची हमी, ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर बाल विकास देखरेख यंत्रणा आणि 18व्या वर्षी सक्षम, विवेकी व संविधाननिष्ठ नागरिक घडविण्याचे धोरण यांचा समावेश आहे.
‘एकही बालक कुपोषित नको, एकही बालक ज्ञानवंचित नको आणि एकही बालक कौशल्यवंचित नको’, अशी भूमिका घेत या मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहिमा, ग्रामसभा, जनजागृती, निवेदने आणि संविधानिक सत्याग्रह करण्यात येणार आहेत. या सत्याग्रहात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. कारभारी गवळी यांनी केले आहे. आंदोलनासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

