लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती आणि संविधानिक नैतिकता रुजविण्याचे आवाहन
जातीय पूर्वग्रह, अंधश्रद्धा, द्वेष व खोटी माहिती दूर करून संविधाननिष्ठ नागरिक घडविण्याचा संकल्प
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाने आपल्या विचार, मूल्ये आणि आचरणाचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस ठरावा. यासाठी प्रत्येक भारतीयाने ‘राष्ट्रीय तिरंगा धारणालय संकल्प’ स्वीकारावा, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी केले आहे.
राष्ट्रीय तिरंग्याच्या तीन रंगांना नागरिकांच्या जीवनमूल्यांशी जोडताना त्यांनी केशरी रंग लोकभक्ती, पांढरा रंग ज्ञानभक्ती आणि हिरवा रंग कर्मभक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. देश, समाज, निसर्ग आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी निःस्वार्थ कार्य करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन व सत्यशोधनातून ज्ञान अद्ययावत ठेवणे आणि ज्ञानाचे कृतीत रूपांतर करून राष्ट्रहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे, हा या संकल्पाचा उद्देश आहे.
अशोकचक्र संविधानिक नैतिकता आणि कायद्याच्या राज्याचे प्रतीक मानून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि कायद्यापुढील समानता ही सार्वजनिक जीवनाची कसोटी असावी, असे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने ‘माझ्यात लोकभक्ती किती आहे? माझे ज्ञान किती अद्ययावत आहे? माझी कर्मभक्ती किती परिणामकारक आहे? आणि माझे आचरण संविधान व कायद्याच्या राज्याशी किती सुसंगत आहे?’ या चार प्रश्नांच्या माध्यमातून स्वतःची स्व-कसोटी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या संकल्पातून जातीय व सामाजिक पूर्वग्रह, अंधश्रद्धा, द्वेष, खोटी माहिती आणि सार्वजनिक कर्तव्याबाबतची उदासीनता दूर करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाने चुकीची किंवा कालबाह्य माहिती बदलणे, दररोज किमान एक लोकहितकारी कृती करणे, पर्यावरणाची जबाबदारी स्वीकारणे आणि सार्वजनिक पदावरील व्यक्तींचे मूल्यमापन जात, धर्म किंवा पक्षाच्या आधारावर न करता त्यांच्या कामगिरी, प्रामाणिकपणा व संविधाननिष्ठेच्या आधारावर करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
‘15 ऑगस्टची प्रतिज्ञा 16 ऑगस्टला संपता कामा नये’, असा संदेश देत शाळा, महाविद्यालये, कार्यालये, ग्रामसभा, सामाजिक संस्था आणि कुटुंबांमध्ये वर्षभर लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती आणि संविधाननिष्ठेवर आधारित स्व-मूल्यमापनाची संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. ‘तिरंगा माझ्या हातातच नव्हे, तर माझ्या हृदयात आणि धारणालयातही सदैव उंच राहील,’ या भावनेतून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिष्ठा आणि संविधानिक मूल्ये आचरणात आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

