अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन
‘समता, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा अण्णाभाऊंचा वारसा युवकांनी पुढे घेऊन जावा -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळ्यात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले.
ग्रामपंचायत सदस्य तसेच डोफ्लगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा, शाहिरीचा आणि समाजजागृतीतील योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या लेखणीतून समाजातील शोषित, वंचित आणि कष्टकरी घटकांच्या वेदना जगासमोर आल्या. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजात रुजविली. त्यामुळे आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या अभिवादन सोहळ्यासाठी अभिजीत पाचारणे, गोपी पाचारणे, निरंजन पाचारणे, ऋषी पाचारणे, ओम पाचारणे, प्रताप पाचारणे, प्रकाश गायकवाड, युवा नेते मयूर काळे, स्वप्निल काळे (वायरमन), अंबादास निकम, निलेश आंग्रे, शाहरुख शेख, संग्राम केदार, राजाराम गायकवाड, विजय आंग्रे, किरण जाधव, लहू कराळे, अर्जुन काळे, निखिल ठोकळ, बाबा गायकवाड यांच्यासह गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, “लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि साहित्यिक परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून कष्टकरी, शोषित आणि वंचित समाजाच्या वेदना मांडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनजागृती केली. त्यांच्या साहित्यामध्ये संघर्ष, स्वाभिमान, समता आणि मानवतेचा संदेश आहे.
आजच्या पिढीने अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. समाजात जात, धर्म आणि भेदभाव विसरून एकोपा, बंधुता आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण झाले पाहिजे. शिक्षण, संघटन आणि सामाजिक जबाबदारी यांद्वारेच आपण प्रगत समाजाची उभारणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

