• Sun. Jul 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अहिल्यानगरात आरपीआयच्या युवकांचा जल्लोष

ByMirror

Jul 26, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यासमोर युवकांचा आनंदोत्सव

‘युवा शक्तीचा विजय, लोकशाहीचा सन्मान’ वाडियापार्कमध्ये घोषणांनी दुमदुमले वातावरण


धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यासमोर युवकांचा आनंदोत्सव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर अहिल्यानगर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) युवकांनी वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जल्लोष साजरा केला. “लोकशाहीचा विजय असो”, “संविधानाचा विजय असो”, “युवा शक्तीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.


कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर नीट पेपरफुटी प्रकरणामुळे मानसिक तणाव आणि नैराश्‍यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित युवकांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत विद्यार्थ्यांना आदरांजली अर्पण केली.
यानंतर युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा हा विजय असल्याचे सांगितले. या जल्लोषात आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, गुलामअली शेख, विजय शिरसाठ, अजीम खान, स्वप्निल साठे, जमीर सय्यद, अजय खरात, नईम शेख, अजीज शेख, शाहबाज शेख, शुभम ठोंबे, लकी वाघमारे आदी सहभागी झाले होते. आंदोलनाच्या माध्यमातून देशातील युवकांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, न्याय आणि उत्तरदायित्वासाठी एकत्र येत लोकशाही मार्गाने लढा दिला असून, त्याला यश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


सुशांत म्हस्के म्हणाले की, “हा केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा विषय नाही, तर लोकशाही आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांचा विजय आहे. देशातील युवक जागृत झाला असून, तो आता शिक्षण, रोजगार आणि देशहिताच्या प्रश्‍नांवर जात, धर्म, पंथ आणि प्रांत यापलीकडे जाऊन एकत्र येत आहे. या आंदोलनाने खऱ्या अर्थाने जागरूक भारतीय युवकांचे दर्शन घडवले आहे.”
ते पुढे म्हणाले की, “सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारण्यास उशीर केला. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी युवकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला, तसेच आंदोलन दडपण्यासाठी महिला आंदोलनकर्त्यांशी गैरवर्तन झाल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले. मात्र, या सर्व दडपशाहीला न जुमानता युवकांनी शांततामय आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवला. त्यामुळे सरकारलाही युवकांच्या ताकदीची आणि जनमताची दखल घ्यावी लागली.”


यावेळी स्वप्निल शिरसाठ यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “हा देशातील युवकांच्या संघर्षाचा विजय आहे. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी देशभरातील युवकांनी एकजुटीने लढा दिला. या संघर्षाला अखेर यश मिळाले असून, हा विजय प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि पालकांचा आहे.” या जल्लोषात सुशांत म्हस्के यांच्यासह शहरातील अनेक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *