नजीर देशमुख, शुभम ठोंबे व अजीज शेख यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी
न्यायासाठी सुशिक्षित युवक रस्त्यावर, तर सत्तेच्या जोरावर गुंड प्रवृत्तीला संरक्षण -सुशांत म्हस्के
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या संघटन विस्ताराला गती देत नगर तालुक्यासह भिंगार शहरातील अनेक युवकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्जेपूरा येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रवेश व नियुक्ती सोहळ्यात नव्या कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षात दाखल झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते नजीर देशमुख यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्याक नगर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच शुभम ठोंबे यांच्यावर नगर तालुका युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली, तर अजीज शेख यांची भिंगार शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी गुलाम शेख, विजय शिरसाठ, अजीम खान, सचिन शिंदे, स्वप्नील साठे, नईम शेख, लकी वाघमारे, अरबाज शेख, योहान चाबुकस्वार, जमीर शेख, हुसेन चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, फिरोज देशमुख, सोहेल पठाण, सचिन ठोंबे, अमोल ठोंबे, समीर देशमुख, अण्णासाहेब चेमटे, बाबासाहेब शेख, रवी ठोंबे, सूरज चेमटे, सुनील टांगळ, रवींद्र ठोंबे, ऋषिकेश डहाळे, आकाश ठोंबे, सुहास ठोंबे, सोहम ठोंबे, राहुल ठोंबे, अमर ठोंबे, प्रथमेश ठोंबे आदी युवकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात प्रवेश करून पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, आजच्या काळात समाजातील सुशिक्षित आणि गुणवंत युवकांना रोजगार, शिक्षण व न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. सत्तेच्या जोरावर गुंड प्रवृत्तीला संरक्षण देण्याचे प्रकार वाढत असताना सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. अशा परिस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर चालणारी चळवळ असून अन्यायाविरोधात ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “पक्षात जात, धर्म, पंथ किंवा आर्थिक स्थिती पाहून नव्हे, तर समाजासाठी काम करण्याची जिद्द आणि प्रामाणिकपणा पाहून जबाबदाऱ्या दिल्या जातात. युवकांनी केवळ राजकारणासाठी नव्हे तर समाजकारणासाठी पुढे यावे. संविधानातील मूल्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे, वंचित घटकांना न्याय मिळवून देणे आणि तरुणांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करत नगर तालुका व भिंगार परिसरात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा, युवकांना एकत्रित करण्याचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

