• Sat. Jul 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

जय हरी विठ्ठलाच्या गजरात शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची बाल वारकरी दिंडी उत्साहात

ByMirror

Jul 24, 2026
अभंग, भारुड, कीर्तन आणि भक्तीगीतांनी अवघे विद्यालय झाले विठ्ठलमय

विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; शाळेच्या प्रांगणात रंगला रिंगण सोहळा


अभंग, भारुड, कीर्तन आणि भक्तीगीतांनी अवघे विद्यालय झाले विठ्ठलमय


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकरी दिंडी सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदुंगाचा निनाद, “जय हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या अखंड गजरात शहरातून निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.


बाल वारकऱ्यांनी पारंपरिक वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान करून दिंडीत सहभाग घेतला. मुलांनी पांढरी टोपी, कपाळी गंध, पांढरा पायजमा आणि बंडी असा वेश धारण केला होता, तर मुलींनी आकर्षक रंगीबेरंगी साड्या, नथ, फुलांचे गजरे आणि पारंपरिक दागिन्यांनी सजून दिंडीत सहभाग नोंदविला. विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत सावता माळी, संत जनाबाई यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.


दिंडीचा प्रारंभ विद्यालयातून झाला. कापड बाजार, नवी पेठ आणि अर्बन बँक मार्गे ही दिंडी पार पडली. मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी बाल वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अनेकांनी विद्यार्थ्यांच्या भक्तिभावाचे कौतुक करत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात टाळ घेऊन अभंग म्हणत “जय जय राम कृष्ण हरी”, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” अशा नामघोषांनी वातावरण दुमदुमून सोडले. मुलींनी फुगड्यांचा फेर धरत वारकरी परंपरेतील लोकसांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. टाळ-मृदुंगाच्या तालावर विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.


दिंडी पुन्हा विद्यालयात परतल्यानंतर शाळेच्या प्रांगणात पारंपरिक रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी अभंग, गवळण, भारुड, कीर्तन, भक्तीगीते आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांनी सादर केलेल्या भक्तिरसपूर्ण कार्यक्रमामुळे संपूर्ण विद्यालय परिसर विठ्ठलभक्तीने भारावून गेला.
या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संत साहित्याविषयी आदर, भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजविणे हा होता. आधुनिक शिक्षणासोबत सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांचे जतन करण्याच्या दृष्टीने विद्यालयाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.


या बालदिंडीसाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर व माध्यमिकाच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनीता लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजन, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिंडीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *