मेरा युवा भारत व सीएसआरडी महाविद्यालयाचा उपक्रम
युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन; स्पर्धेत लोकगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, वादविवाद, लघुपट/रील, घोषवाक्यांचा समावेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत अहिल्यानगर व सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंट (सीएसआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ‘युवा शक्ती, नशा मुक्त भारताची शक्ती’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, सर्जनशीलतेला चालना देणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करणे हा असून, या स्पर्धेत युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा 29 जुलै रोजी शहरातील सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंट (सीएसआरडी) महाविद्यालय येथे होणार आहे. जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील सर्व युवक-युवती या स्पर्धांमध्ये वैयक्तिक अथवा गट स्वरूपात सहभागी होता येणार आहे.
स्पर्धांमध्ये लोकगीत (संगीत), नृत्य, नुक्कड नाटक/माईम, चित्रकला, वादविवाद, लघुपट/रील, घोषवाक्य लेखन तसेच कविता/स्लॅम पोएट्री अशा विविध कला व साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व स्पर्धांचा विषय ‘नशा मुक्त भारत’ हा असून युवकांनी व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश आपल्या कलाकृतीतून मांडायचा आहे.
स्पर्धेतील उत्कृष्ट विजेत्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी माय भारत या पोर्टलवर नोंदणी करून संबंधित विभाग निवडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज सादर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमामुळे युवकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असून समाजात व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी 9423470437 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

