बुरुडगावच्या आदर्श व हायटेक दिंडीची सांगता
दिंडीसाठी योगदान देणार्यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाचा विकास साधण्यासाठी एकमेकांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. गावाचे प्रति पंढरपूर करण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी योगदान देण्याची गरज आहे. गावात ग्रामपंचायतीला उत्पन्न असल्याशिवाय विकास करणे व सुविधा देणे अशक्य आहे. ग्रामस्थांकडे पैसे असून, खर्च कुठे करायचा? याचा मेळ बसत नसल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. योग्य ठिकाणी पैसे जात असल्याची जाणीव झाल्यास जनता देखील पैसे देण्यास मागे पुढे पाहत नाही, असे प्रतिपादन आदर्शगाव पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
बुरुडगाव (ता. नगर) येथील आदर्श व हायटेक दिंडी म्हणून ओळख असलेल्या श्री आशितोष महादेव पायी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरला आषाढी वारी पूर्ण करुन गावात परतल्याबद्दल दिंडीच्या सांगता सोहळ्यात पेरे पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, ह.भ.प. लक्ष्मण महाराज शास्त्री, ह.भ.प. योगेश महाराज, ह.भ.प. अमोल महाराज जाधव, ह.भ.प. राहुल महाराज दरंदले, ह.भ.प. दीपक महाराज भवर, माजी सरपंच बापूसाहेब कुलट, उपसरपंच महेश निमसे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, वारकरी, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://mirrornews24.in/wp-content/uploads/2022/07/DSC_0693-1024x517.jpg)
पुढे पेरे पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीने ग्रामस्थांकडून कर स्वरुपात पैसे घेऊन, त्या मोबदल्यात जेवढे चांगले देता येईल तेवढे जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करावा. रोगाच्या मुळावर घाव घालून उपाय झाला पाहिजे. गावाच्या विकासासाठी कोणत्या पुढार्यावर विसंबून न राहता, स्वतःच्या गावाचा विकास स्थानिक ग्रामस्थांनाच साधावा लागणार असल्याचे त्यांनी सांगून, पाटोदा मध्ये 5 हजार रुपयात चार प्रकारचे पाणी, वाय-फाय, जीम, महिलांना सेनेटरी नॅपकीन, दळण आदी देत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती त्यांनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांना उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. तर दिंडीत योगदान देणारे प्रा. डॉ. संतोष यादव, जालिंदर तात्या कुलट, किशोर कुलट, राधाकिसन कुलट, शिवाजी मोढवे, बापूसाहेब औताडे, शनी तांबे, फारूक पठाण, नंदू टीमकरे, अक्षय लगड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ह.भ.प. लक्ष्मण महाराज शास्त्री यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाला दिशा देण्याची गरज आहे. समाजाची सेवा केल्यास गाव विकासात्मक दिशेने जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. डॉ. संतोष यादव यांनी या दिंडीतील वारकर्यांनी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षरोपण करुन स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. दिंडीत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र फिरते स्वच्छता गृहाचा व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दिंडीतील सर्व सहभागी वारकर्यांचा विमा उतरविण्यात आला होता. त्याचबरोबर दिंडीबरोबर रुग्णवाहिका देखील होती. दिंडीतील रथाभोवती बसवलेल्या सीसीटिव्ही कॅमेरेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी घरी बसल्या वारीचा अनुभव घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
![](https://mirrornews24.in/wp-content/uploads/2022/07/DSC_0734-1024x513.jpg)
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गावात संत परंपरेचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जात असताना विकास देखील साधला गेला पाहिजे. दिंडी प्रत्येकाला एक शिस्त लावत असते, शिस्त व योगदानातून गावाचा विकास शक्य आहे. गावाच्या विकासासाठी लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. गावात अनेक योजना व विकासकामे राबविली जातात. मात्र त्याचा सांभाळ करण्याचे काम ग्रामस्थांचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच बापूसाहेब कुलट यांनी केले होते. यावेळी ग्रामसेवक जयश्री जाधव, तलाठी आगळे भाऊसाहेब, सुधाकर मोढवे, माजी नगरसेवक अरुणभाऊ शिंदे, निवृत्त जवान संघटनेचे सर्व पदाधिकारी, माजी उपसरपंच सिराज शेख, खंडू काळे, माजी सरपंच बाबासाहेब पाचारणे, राजू क्षेत्रे, सदस्य रवीभाऊ ढमढेरे, पांडुरंग जाधव, गणेश दरंदले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष यादव यांनी केले. आभार जालिंदर तात्या कुलट यांनी मानले.