गोसंवर्धनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचा उपक्रम; गोसेवेतून व्यक्त केली कृतज्ञता
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील अरुणोदय गोशाळेत सात दिवस पुरेल इतक्या चाऱ्याचे वाटप करून गोसेवेचा संदेश देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत पशुसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
स्व. अजित पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहिताला प्राधान्य देणारे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. गोमातेची सेवा ही भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा असून गोशाळांच्या माध्यमातून निराधार जनावरांचे संगोपन करणाऱ्या संस्थांना समाजाने सहकार्य करणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे गोशाळेला सात दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध झाला असून गोसेवेच्या कार्याला हातभार लागला आहे.
कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, शहर जिल्हा कार्याध्यक्ष (ओबीसी) नितीन घोडके, शहर जिल्हा उपाध्यक्ष किरण मेहेत्रे, संतोष हजारे, किरण जावळे, विक्रम बोरुडे, महेश सुडके, महेश गाडे, आशिष भगत, विश्वास शिंदे, संकेत लोंढे, वैभव नेमाने, शैलेश सत्रे, सुजल झुंजारे, सुनील शिंदे, निखिल ताठे, गणेश शेलार, प्रसाद भडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक खेडकर म्हणाले की, स्व. अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. गोसेवा ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून गोशाळांना मदत करणे ही प्रत्येक समाजघटकाची नैतिक जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल आगामी काळातही रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, गरजूंना मदत आणि गोसेवा अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी असलेली बांधिलकी जपत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, गोसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सेवाभाव या मूल्यांचा समाजात प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. गोशाळा अनेक निराधार जनावरांचे संगोपन करतात. अशा संस्थांना समाजाने मदतीचा हात दिल्यास त्यांचे कार्य अधिक सक्षम होईल. स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केलेला हा उपक्रम सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

