• Tue. Jul 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

माजी प्राचार्या हेमलता गीते यांच्या ‘मानवसूक्त’ काव्यसंग्रहाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले काव्य पुरस्कार जाहीर

ByMirror

Jul 20, 2026

जगतगुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पुरस्काराने होणार गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मातृत्व, स्त्रीशक्ती, मानवी संवेदना आणि जीवनमूल्यांचा प्रभावी शब्दाविष्कार करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री तथा माजी प्राचार्या हेमलता प्रदीप गीते यांच्या ‘मानवसूक्त’ या काव्यसंग्रहाला स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले काव्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार 25 जुलै रोजी निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित ‘जगतगुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन’ सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा साहित्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.


हेमलता गीते या मराठी साहित्यविश्‍वातील संवेदनशील आणि अभ्यासू कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या ‘मातृवृक्ष’ या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले होते. या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
नुकताच प्रकाशित झालेला त्यांचा ‘मानवसूक्त’ हा दुसरा काव्यसंग्रह साहित्यप्रेमींकडून विशेष दाद मिळवत आहे. या संग्रहात शंभर निवडक कवितांचा समावेश असून, प्रत्येक कवितेत जीवनातील विविध अनुभव, नाती, भावभावना, संघर्ष, संवेदना आणि मूल्यांचा प्रभावी आविष्कार करण्यात आला आहे. मानवी आयुष्याच्या अनेक छटा या कवितांमधून प्रत्ययास येतात. जीवनातील सुख-दुःख, आशा-निराशा, नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि सकारात्मक विचार यांचे अत्यंत प्रभावी चित्रण या काव्यसंग्रहात आढळते.


विशेष म्हणजे, आजच्या स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त जीवनात अपयशामुळे अनेक तरुण नैराश्‍याकडे व आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयांकडे वळताना दिसतात. अशा युवकांना आत्मविश्‍वास, जिद्द आणि सकारात्मक जीवनदृष्टी देणाऱ्या प्रेरणादायी कविता ‘मानवसूक्त’मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा काव्यसंग्रह केवळ साहित्यकृती न राहता समाजाला दिशा देणारा प्रेरणास्रोत ठरत आहे.


पुरस्कार निवड समितीने ‘मानवसूक्त’च्या आशयघनता, साहित्यिक दर्जा, सामाजिक भान आणि प्रस्तावनेतील वैचारिक मांडणीची दखल घेत हा पुरस्कार जाहीर केला आहे. हेमलता गीते या उत्कृष्ट कवयित्री, प्रभावी काव्यवाचक आणि ललित लेखिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट काव्यलेखन, काव्यसादरीकरण आणि ललित साहित्य निर्मितीसाठी त्यांना आजपर्यंत सुमारे दीडशेहून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच दिल्ली येथील दलित साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा ‘वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप अवॉर्ड’ यासह अनेक मानाचे सन्मान त्यांच्या नावावर आहेत. ‘मानवसूक्त’ या काव्यसंग्रहाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले काव्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *