शहरात दिंडीचे मुस्लिम समाजातील युवकांकडून स्वागत
धर्म वेगळे, माणुसकी एकच! मुस्लिम समाजाने उभारला प्रेम, सेवा आणि एकात्मतेचा सेतू
संतांची शिकवण आणि सुफींचा संदेश एकवटला; वारकऱ्यांच्या सेवेतून उजळली माणुसकी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पायी यात्रा नसून, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीतील समता, सेवा, प्रेम आणि बंधुभावाचा अखंड प्रवाह आहे. या परंपरेला साजेसा हृदयस्पर्शी अनुभव शहरातील कोठला परिसरात पाहायला मिळाला. श्रीक्षेत्र नेवासाहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळा दिंडीचे शहरातील मुस्लिम समाज आणि आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशन यांच्या वतीने अत्यंत उत्साहात सेवाभावाने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला.
दिंडीचे कोठला येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या घोषात दिंडीचे आगमन झाले. हातात पाण्याच्या बाटल्या आणि अल्पोपहार घेऊन उभे असलेले युवक प्रत्येक वारकऱ्याला प्रेमाने हाक मारत होते “माऊली… पाणी घ्या… अल्पोपहार घ्या…”. हा सेवाभाव पाहून अनेक वारकरी भारावून गेले. काहींनी या उपक्रमाचे कौतुक करत, “हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती” अशी भावना व्यक्त केली.
दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांनीही मुस्लिम बांधवांनी केलेल्या आदरातिथ्याला मनापासून प्रतिसाद दिला. अनेकांनी प्रेमाने हस्तांदोलन करुन बंधुभावाचे दर्शन घडविले. काही क्षणांसाठी धर्म, जात, पंथ, भाषा यांचे सर्व भेद विरघळून गेले आणि “अवघे एकचि झालो आपण” हा संतविचार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.
या स्वागत उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार, नगरसेवक हाजी शहबाज, मुज्जू शेख, सुशांत म्हस्के, मोहसीन शेख, अकबर अली, दानिश शेख, शाहनवाज शेख, शाकिर शेख, शहबाज बॉक्सर, जाकीर तांबोळी, अकदस शेख, साजिद शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना साहेबान जहागीरदार म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. प्रत्येक वारकरी जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन विठ्ठलभक्ती करतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतून संपूर्ण मानवजातीला प्रेम, समता आणि मानवतेचा संदेश दिला. इस्लाम धर्मदेखील करुणा, प्रेम, सेवा आणि बंधुभाव शिकवतो. त्यामुळे संत आणि सुफी परंपरेचा मूलभूत संदेश एकच आहे माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे.”
ते पुढे म्हणाले, आज काही प्रवृत्ती समाजात जाती-धर्माच्या नावाने भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न करतात. पण महाराष्ट्राची खरी ओळख ही संत, सुफी आणि समाजसुधारकांच्या समन्वयाच्या विचारात आहे. या भूमीने अनेक सुफी-संतांची शिकवण जपली आहे. प्रेमाचे पूल बांधणे आणि द्वेषाच्या भिंती पाडणे हीच काळाची गरज आहे. या छोट्याशा सेवाभावी उपक्रमातून आम्ही धार्मिक एकात्मता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झालेल्या युवकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि वारकऱ्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञता या दोन्ही भावनांनी उपस्थितांचे मन जिंकले. आजच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणात कोठला परिसरात घडलेला हा प्रसंग केवळ स्वागताचा कार्यक्रम न ठरता, तर तो धर्मांमधील परस्पर आदर, विश्वास आणि प्रेमाचा जिवंत संदेश ठरला.

