जातिभेद, अंधश्रद्धा व भेदभावमुक्त समाजासाठी नवा वैचारिक उपक्रम -ॲड. कारभारी
निसर्ग, मानवता आणि संविधान मूल्यांवर आधारित नव्या स्वधर्माची मांडणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाच्या कलम 25 ने प्रत्येक नागरिकाला अंतःकरणाचे स्वातंत्र्य तसेच धर्माचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. या संवैधानिक अधिकाराच्या चौकटीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘पसायदान’ या विश्वकल्याणाच्या संदेशातून प्रेरणा घेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी, त्यांचे मित्र, सहकारी आणि विचारसहकारी यांनी ‘पसायदानी स्वधर्म’ स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सार्वजनिकरित्या हा स्वधर्म स्वीकारून निसर्ग, जीवसृष्टी आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी सामूहिक संकल्प करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. गवळी यांनी दिली.
हा स्वधर्म कोणत्याही विशिष्ट जात, पंथ, कर्मकांड किंवा जन्माधारित श्रेष्ठत्वावर आधारित नसून संविधानातील न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि पर्यावरणीय जबाबदारी या मूल्यांना अंतःकरणाची दिशा देणारा विचार आहे. निसर्ग, सर्व जीवसृष्टी आणि मानवतेच्या एकात्मिक कल्याणासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून जीवन जगावे, हा या स्वधर्माचा मुख्य गाभा असल्याचे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले आहे.
‘पसायदानी स्वधर्म’ हा कोणत्याही संकुचित धार्मिक चौकटीत बसणारा विचार नाही. तो माणसाला निसर्गाशी, जैवविविधतेशी, सर्व सजीवांशी आणि संपूर्ण मानवतेशी जोडणारा कर्तव्यधर्म आहे. पसायदानातील ‘सर्वेश्वर’ ही संकल्पना कोणत्याही एका देवता, मूर्ती किंवा पंथापुरती मर्यादित नसून संपूर्ण सृष्टीत व्यापलेल्या जीवनशक्तीचे प्रतीक आहे. माती, पाणी, वृक्ष, पशुपक्षी, जैवविविधता, मानवसमाज आणि निसर्ग हेच या स्वधर्मातील सर्वेश्वराचे स्वरूप मानले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते, संविधान नागरिकांना अधिकार प्रदान करते; मात्र त्या अधिकारांना निसर्गनिष्ठ, विवेकनिष्ठ आणि मानवतावादी दिशा देण्यासाठी मूलभूत कर्तव्यांची जाणीव तितकीच आवश्यक आहे. त्यामुळे हा स्वधर्म संविधानविरोधी नसून संविधानाला पूरक आहे. कायद्याच्या बाह्य चौकटीला अंतःकरणातील स्व-जाणीव, स्व-वर्तन आणि स्व-कर्तव्यांची प्राणशक्ती देणारा हा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.
जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणीय संकटे, जातिव्यवस्था, स्त्रीदास्य, मतदास्य, अंधश्रद्धा, अंधानुकरण, कर्मकांडवाद आणि सामाजिक भेदभाव यांसारख्या समस्या आज जगासमोर उभ्या आहेत. या समस्या केवळ सामाजिक किंवा प्रशासकीय नसून मानवी विचारपद्धतीतील चुकीच्या संस्कारांचे परिणाम असल्याचे मत ॲड. गवळी यांनी व्यक्त केले. माणसाच्या दीर्घकालीन स्मृतीत भीती, जातिभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ भावना आणि निसर्गविरोधी जीवनपद्धती रुजल्यामुळे समाज अधोगतीकडे जातो; मात्र त्याऐवजी विवेक, समता, निसर्गप्रेम आणि मानवतेची मूल्ये स्वीकारली तर समाज सकारात्मक परिवर्तनाकडे वाटचाल करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
या स्वधर्माचा पहिला सामाजिक संकल्प म्हणजे जातिव्यवस्थेचे संपूर्ण उच्चाटन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जन्माधारित श्रेष्ठत्व, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता, मतदास्य, अंधश्रद्धा, अंधानुकरण आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव यांना या स्वधर्मात स्थान नसेल. विज्ञाननिष्ठ विचार, करुणा, सेवा, समता आणि विवेक हीच या स्वधर्माची मूलभूत तत्त्वे असतील.
या स्वधर्मानुसार प्रत्येक व्यक्तीने निसर्गाचे संरक्षण करणे, पाण्याचे संवर्धन करणे, वृक्षसंवर्धन करणे, सर्व जीवांशी करुणेने वागणे, जात-पात नाकारणे, स्त्री-पुरुष समानता स्वीकारणे, विचारस्वातंत्र्य जपणे, अंधश्रद्धेला नकार देणे, विज्ञाननिष्ठ जीवनशैली स्वीकारणे आणि मानवतेच्या सार्वत्रिक कल्याणासाठी कार्य करणे ही मूलभूत कर्तव्ये स्वीकारावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संविधानाच्या कलम 25 अंतर्गत हा स्वधर्म स्वीकारताना सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा पूर्ण आदर राखला जाईल. हा उपक्रम कोणत्याही धर्म, पंथ किंवा समाजाविरुद्ध नसून सर्व जीवनाच्या कल्याणासाठी आहे. समाजातील भेदभाव, अंधश्रद्धा आणि निसर्गविरोधी जीवनमूल्यांना पर्याय म्हणून समता, विवेक आणि पर्यावरणीय जबाबदारीची नवी मूल्यव्यवस्था निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

