वकिलांच्या वतीने होणार गौरव
नगर अर्बन बँक भ्रष्टाचारविरोधी 16 वर्षांच्या विनामोबदला लढ्याचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचाराविरोधात ठेवीदारांच्या हितासाठी तब्बल 16 वर्षे सातत्याने धाडसाने आणि विनामोबदला कायदेशीर लढा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अच्युतराव पिंगळे यांचा “न्याय वंदना कार्यक्रम” अंतर्गत “जनलोक हितवादी ॲडव्होकेट जीवन गौरव” या विशेष सन्मानाने गौरव करण्याचा पुढाकार महाराष्ट्रातील विधिज्ञ बांधवांच्या वतीने घेण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ॲड. अच्युतराव पिंगळे यांनी नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी केलेले काम हे वकिली व्यवसायातील लोकहितवादी परंपरेचे उज्ज्वल उदाहरण असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हटले आहे.
नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहमदनगर, जालना आणि पुणे जिल्ह्यांत एकूण 47 शाखा होत्या. बँकेतील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांमुळे बँक लिक्विडेशनमध्ये गेली. या प्रक्रियेमुळे हजारो ठेवीदारांचे कष्टाचे पैसे अडकले. दिवंगत खासदार दिलीप गांधी हे या बँकेचे दशकाहून अधिक काळ अध्यक्ष राहिले होते. त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, असे ठेवीदार आणि जनहित कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर ॲड. अच्युतराव पिंगळे यांनी ठेवीदारांच्या बाजूने सातत्याने कायदेशीर लढा उभारला. अनेक कायदेशीर अडथळे, प्रशासकीय गुंतागुंत आणि दीर्घकालीन संघर्ष असतानाही त्यांनी कोणतेही मानधन न घेता ही जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या लोकहितवादी प्रयत्नांमुळे ठेवीदारांना आतापर्यंत सुमारे 80 टक्के रक्कम परत मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, “वकिली व्यवसाय केवळ मानधनावर चालणारा व्यवसाय नाही, तर तो समाजन्यायाचा जिवंत आधारस्तंभ आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक वकिलांनी देशासाठी आपले ज्ञान, वेळ आणि आयुष्य अर्पण केले. त्याच परंपरेचा वारसा ॲड. अच्युतराव पिंगळे यांनी नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी उभा केला आहे. म्हणूनच त्यांना ‘जनलोक हितवादी ॲडव्होकेट जीवन गौरव’ देणे ही महाराष्ट्रातील विधिज्ञ बांधवांची कृतज्ञता आहे.”
या सन्मानामागील उद्देश केवळ एका व्यक्तीचा गौरव करणे नसून, वकिली व्यवसायात सार्वजनिक कारणांसाठी नि:स्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा निर्माण करणे हा आहे. भ्रष्टाचार, आर्थिक अन्याय, ठेवीदारांचे हक्क, ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक संस्थांची पारदर्शकता या प्रश्नांवर वकील बांधवांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असा संदेश या न्याय वंदना कार्यक्रमातून दिला जाणार आहे.
दरम्यान, ॲड. अच्युतराव पिंगळे यांनी नगर अर्बन बँक पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची घोषणा केली आहे. पारदर्शकता, ठेवीदारांचा विश्वास आणि लोकहितवादी आर्थिक शिस्त या आधारांवर बँकेचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. “जनलोक हितवादी ॲडव्होकेट जीवन गौरव” हा सन्मान नगर अर्बन बँकेतील भ्रष्टाचारविरोधी लढ्याचा, ठेवीदारांच्या न्यायहक्कांचा आणि विनामोबदला जनहितासाठी कार्य करणाऱ्या वकिली परंपरेचा सन्मान आहे. महाराष्ट्रातील विधिज्ञ बांधवांनी या उपक्रमाला सहकार्य करावे आणि सार्वजनिक न्यायाच्या कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या सन्मानासाठी अहमदनगर बार असोसिएशनने पाठिंबा दिला असून, यासाठी अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे, ॲड. भाऊसाहेब घुले, सचिव ॲड. विनोद शेटे, ॲड. आनंद सूर्यवंशी, ॲड. अमोल अकोलकर, ॲड. सारिका झरेकर, ॲड. वसीम खान, ॲड. प्राजक्ता करांडे, ॲड. आजिनाथ कर्डिले, ॲड. महेश कोतकर, ॲड. प्रमोद खामकर, ॲड. ज्ञानदेव दाते, ॲड. अक्षय म्हस्के, ॲड. शिवाजी शिंदे आदी प्रयत्नशील आहेत.

