सकाळी 7 ते मध्यरात्रीपर्यंत बीएलओंची धावपळ; नागरिकांनी गणना प्रपत्र भरून सहकार्य करण्याचे आवाहन
शालेय जबाबदारी सांभाळत शिक्षकांकडून मतदार पुनरीक्षणाचे काम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला असून, बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या घरभेटींची मोहीम जोरात सुरू आहे. मतदार यादी अद्ययावत, अचूक आणि त्रुटीरहित करण्यासाठी बीएलओ सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेत आहेत. मतदारांची ओळख, राहण्याचा पत्ता, आवश्यक कागदपत्रे तसेच इतर तपशीलांची पडताळणी करून माहिती संकलित केली जात आहे.
या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर शिक्षक बीएलओ म्हणून कार्यरत आहेत. प्रशासनाच्या वतीने बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले असले तरी अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्य अत्यल्प आहे. त्यामुळे शिक्षकांना बीएलओचे काम करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी देखील शाळेतील अध्यापनाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. अनेक शिक्षक सकाळी सात वाजल्यापासून घराबाहेर पडून दिवसात काही वेळ शालेय कामकाज सांभाळत रात्री बारा वाजेपर्यंत मतदार पुनरीक्षणाचे काम करत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. त्यामुळे अध्यापन आणि मतदार पुनरीक्षण अशा दुहेरी जबाबदाऱ्या शिक्षकांवर पडल्या असून, त्यांची मोठी कसरत सुरू आहे.
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत प्रत्येक मतदाराची माहिती अद्ययावत करणे, नवीन पात्र मतदारांची नोंद करणे तसेच मृत, स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांची माहिती निश्चित करणे हे उद्दिष्ट आहे. यासाठी बीएलओंना नागरिकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता असून, घरभेटीदरम्यान आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या मतदारांकडून गणना प्रपत्र भरून दिले जाणार नाही किंवा आवश्यक माहिती उपलब्ध होणार नाही, अशा मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत बीएलओंना वेळेवर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मतदार यादीतील माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बीएलओ घरभेटीसाठी आल्यानंतर त्यांना योग्य माहिती देणे, आवश्यक कागदपत्रे दाखविणे आणि गणना प्रपत्र तातडीने भरून देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

