• Sat. Jun 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

दिवसा काम, रात्री शिक्षण घेणाऱ्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप

ByMirror

Jun 27, 2026
दिवसा काम, रात्री शिक्षण घेणाऱ्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप

कष्टकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ; रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेदला हातभार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवसभर विविध व्यवसाय, दुकाने, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी काम करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत गेल्या सहा दशकांपासून समाजात वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या नवविद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वितरण करण्यात आले. याचवेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.


या कार्यक्रमात नवविद्या प्रसारक मंडळाचे विश्‍वस्त मंगेश धर्माधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेतील विविध सुविधा, शिक्षकांचा परिचय आणि आगामी शैक्षणिक वर्षासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक पांडुरंग गवळी यांनी रात्रशाळेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, अनेक विद्यार्थी कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे दिवसा नियमित शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा ही शिक्षणाची दुसरी संधी ठरते. विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आणि शिक्षणप्रेमींच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याची मदत केली जाते. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे कोणाच्याही शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.


मंगेश धर्माधिकारी म्हणाले की, शिक्षण हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी गुरूजनांचा आदर ठेवून प्रामाणिकपणे ज्ञानार्जन करावे. दिवसभर कष्ट करून रात्री शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या जिद्दीने आपले भविष्य घडवत आहेत. कापड दुकाने, हॉटेल्स तसेच विविध व्यवसायांमध्ये काम करूनही अभ्यासात चांगले यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची चिकाटी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करत इयत्ता दहावीमध्ये 67.83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सौ. मुक्ता ताकटे, 60 टक्के गुणांसह द्वितीय आलेल्या सौ. ताई जगधने तसेच तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या सौ. उज्वला नेटके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. याचवेळी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि आवश्‍यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेतील शैक्षणिक वातावरण, शिक्षकांची कार्यपद्धती आणि उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात आली, जेणेकरून त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होईल.


कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष उत्तम खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवविद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, सचिव निलेश वैकर, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. गीते तसेच सर्व विश्‍वस्तांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले, तर देवका लबडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विना कुऱ्हाडे, सुषमा धारूरकर, राजू भुजबळ आणि महेंद्र म्हसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *