राही फाउंडेशन, जय युवा अकॅडमी व महिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम
महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर, महिलांना प्रोत्साहन द्यावे -आ. अक्षय कर्डिले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असून, महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी उपलब्ध आहे. कुटुंबीयांनी देखील त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेऊन सक्षम होणे गरजेचे आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी महिला स्वयंरोजगार प्रकल्पात अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन आमदार अक्षय कर्डिले यांनी केले.
राही फाउंडेशन, जय युवा अकॅडमी व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्तृत्ववान लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने शेंडी (ता. नगर) येथे आयोजित महिला स्वयंरोजगार प्रकल्पाच्या महिला मेळाव्यात आमदार कर्डिले बोलत होते. यावेळी जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, भाऊसाहेब पादीर, राही फाउंडेशनच्या संचालिका रूपाली करांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रेवणनाथ चोभे, शेंडी ग्रामपंचायतच्या सरपंच प्रयागाताई लोंढे, महिला आर्थिक विकास मंडळाच्या तेजल तोडमल, सुवर्णा पारे, निलेश गर्जे, सपना दाणे आदी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सरपंच प्रयागाताई लोंढे यांनी कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी महिलांनी स्वयंरोजगारीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवणकामाचे कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचे पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बचत गट चळवळीतूनही महिला आर्थिक सक्षम होत आहेत. परंतु उद्योग व्यवसाय, बाजारपेठ, कच्चामाल प्रशिक्षण याबाबत महिलांनी जागरूक राहिण्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. महेश शिंदे म्हणाले की, महिलांना प्रशिक्षणानंतर प्रत्येक हाताला काम यानुसार घरबसल्या शिवणकला प्रशिक्षण व त्यानंतर रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच महिलांना तीन महिने ट्रेनिंग काळात स्टायपेंड देखील दिला जाणार असून, किमान तीन वर्षे स्वयंरोजगारीची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. कटिंग केलेले कापड, दोरा, प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊन दिलेल्या कामाबाबत नोटरी ॲग्रीमेंट केले जात आहे. ग्रामीण भागातील किमान 500 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालिका रूपाली करांडे म्हणाल्या की, महिला सक्षमीकरणासाठी सदर प्रकल्प अत्यंत उपयुक्त असून, घरात काम दिले जात असल्याने घरातील कामे, मुलांचे संगोपन, घरातील जेष्ठ नागरिकांकडे लक्ष, शेतीतील कामे सर्व पाहून मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत शालेय गणवेश, ॲप्रण व पिलोकव्हर व इतर वस्तू शिकवण्याचे काम कारवायाचे आहे. त्यातून चांगल्या प्रकारे अर्थाजन करण्याची संधी महिलांना मिळत आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी घरबसल्या कामाबाबत सहभाग नोंदवा असे आवाहन त्यांनी आहे.
महिला स्वयंरोजगार प्रकल्पासाठी ॲड. आरती शिंदे, सिंधू वाणी, वनिता पाडळे, मंजू रॉय, संगीता रणनवरे, ॲड. विद्या शिंदे, कविता अभंग, जयश्री शिंदे, स्वाती डोमकावळे, अश्विनी वाघ, मीना म्हसे, हेमलता कांबळे, दिपाली उदमले, अनिल साळवे, निलेश रासकर आदी परिश्रम घेत आहेत.

