• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

संविधानाला ‘पसायदान’ची जोड देण्याचा जनलोक संकल्प; २६ जूनला हुतात्मा स्मारकात अनोखा उपक्रम

ByMirror

Jun 22, 2026
डॉ. आंबेडकरांचे संविधान आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान यांचा मिलाफ घडविण्याचा प्रयत्न

‘मनुस्मृतीच्या अदृश्य शासनाला नकार, समता-बंधुत्वाचा स्वीकार’ -पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची भूमिका


डॉ. आंबेडकरांचे संविधान आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान यांचा मिलाफ घडविण्याचा प्रयत्न


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारताचे संविधान लागू होऊन ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला असला, तरी समाजजीवनाच्या शेवटच्या स्तरावर मनुस्मृतीची जातीय, विषमतावादी आणि केंद्राभिमुख शासनवृत्ती अद्यापही विविध स्वरूपात कार्यरत असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दिनांक २६ जून रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर येथील हुतात्मा स्मारक परिसरात भारतीय संविधानाच्या मागील कव्हर पानावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘पसायदान’चे पान प्रतीकात्मकरीत्या जोडण्याचा ‘जनलोक संकल्प’ करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.


संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, भारतीय समाजात समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये रुजविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृती दहन करून ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. त्या घटनेला शतक पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर देश उभा असतानाही जातव्यवस्था, सामाजिक भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, धर्माधारित भेदभाव आणि विषमतावादी विचारांचे प्रभावी अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही. ही लोकशाहीसमोरील गंभीर चिंतेची बाब असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.


या उपक्रमाचा उद्देश संविधानाची जागा बदलणे नसून, संविधानाला अधिक व्यापक नैतिक अधिष्ठान देणे हा आहे. संविधान हे देशाच्या कायदेशीर व प्रशासकीय व्यवस्थेचे चाक आहे, तर संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे समाजाच्या अंतःकरणातील समता, करुणा, विवेक, बंधुता, निसर्गसेवा आणि सर्व जीवांच्या कल्याणाचे प्रतीक असल्याचे संघटनेचे मत आहे.
लोकशाहीचा प्रवास केवळ कायद्याच्या आधारे नव्हे, तर नैतिक मूल्यांच्या आधारावर अधिक सक्षम होतो. त्यामुळे संविधान आणि पसायदान या दोन मूल्यप्रणालींचा संगम देशाला अधिक न्यायनिष्ठ, संतुलित आणि मानवतावादी दिशा देऊ शकतो, असे संघटनेचे म्हणणे आहे.


जनलोक संकल्पामध्ये भारतात कोणतीही जातव्यवस्था स्वीकारली जाणार नाही, राज्याचा कोणताही धर्म असणार नाही आणि मनुस्मृतीसारख्या विषमतावादी विचारसरणीचे मागील दाराने होणारे शासन नाकारले जाईल, अशी भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. तसेच भारतीय संविधानातील कलम ५१-अ मध्ये नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांसह संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विश्वकल्याण, सद्भावना आणि मानवतेच्या तत्त्वांवर आधारित सामाजिक व्यवस्था उभारण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
संघटनेच्या मते, पसायदान हे भारतीय संविधानाच्या कलम ५१-अ चे नैतिक, सामाजिक आणि चेतनात्मक परिशिष्ट म्हणून स्वीकारले जावे. संविधान नागरिकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सांगते, तर पसायदान त्या कर्तव्यांना करुणा, विवेक, संवेदनशीलता आणि विश्वबंधुत्वाची दिशा देते. त्यामुळे संविधानातील मूल्यांचे समाजजीवनात अधिक प्रभावीपणे संवर्धन होऊ शकते.


पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने मांडलेल्या भूमिकेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान यांचा मिलाफ हा भारताच्या सामाजिक व नैतिक शासनक्रांतीचा पुढील टप्पा ठरू शकतो. संविधान नागरिकांना हक्क आणि कर्तव्ये प्रदान करते, तर पसायदान त्या हक्क-कर्तव्यांना सर्व जीवांच्या कल्याणाची आणि विश्वमानवतेची दिशा देते.


२६ जून रोजी अहिल्यानगर येथील हुतात्मा स्मारकातून याच विचारांचा जनलोक संकल्प व्यक्त करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने ॲड. कारभारी गवळी यांनी म्हटले आहे.
या संकल्प अभियानासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *