2 हजारांहून अधिक नागरिकांचा आंतरराष्ट्रीय योग दिनात उत्स्फूर्त सहभाग; भारताला 11 सुवर्णपदके मिळवून देणाऱ्या योगासन खेळाडूंचा गौरव
योगामुळे शरीरस्वास्थ्याबरोबरच मनःशांतीही लाभते – महापौर ज्योतीताई गाडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, काका स्ट, क्रीडा भारती व विविध योग संस्था व एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी (दि.21 जून) सकाळी सावेडी येथील जॉगिंग पार्कच्या मैदानात हा योगमय सोहळा रंगला होता.
निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते व महापौर ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा भारतीचे चंद्रशेखर कुलकर्णी, अभय महाजन, डॉ. रविंद्र साताळकर, डॉ. हर्षवर्धन तन्वर, गिरीश कुलकर्णी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते निर्मल थोरात, सुनील जाधव, मनीषा पुंडे व कोमल वाकळे बरोबरच महानगरपालिकेचे नगरसेवक व नगरसेविका क्रीडा संघटनांचे पदाधिकारी शैलेश गवळी, संजय साठे, मनीष राठोड शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडू, पालक असे 2 हजारपेक्षा अधिक नागरिक यांची योग दिन कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.

महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शरीरस्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत असताना योगामुळे केवळ शरीर निरोगी राहत नाही, तर मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले की, योग ही आरोग्याची गुरुकिल्ली असून निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. जिल्हावासीयांनी नियमित योग करून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एम.एम.वाय.टी.सी. संस्थेच्या अनुभवी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सामूहिक योगसत्रात प्रार्थना, सूक्ष्म व्यायाम, विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित साधकांनी वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन तसेच बैठक स्थितीतील विविध आसनांचा उत्साहपूर्ण सराव करून योगाभ्यासात सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी उपस्थितांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलन राखण्याचा संकल्प करून शपथ दिली. ‘ओम सर्वे भवन्तु सुखिनः’ या मंगल प्रार्थनेने वातावरण भक्तिमय झाले. अखेरीस राष्ट्रगीताने या उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी योग सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास विविध योग संस्था, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, योगप्रेमी नागरिक तसेच जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा भारतीचे वेदपाल तन्वर, सुधीर चपळगावकर, अमोल धोपावकर, कीर्ती धोपावकर, यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी प्रियांका खिंडरे, रंजन तडवी,प्रवीण कोंढावळे, विशाल गर्जे, संतोष वाबळे, रमेश जगताप, अवधूत शेजुळ, सागर पवार आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी मानले.
–
पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताला अकरा सुवर्णपदक पटकावून देणाऱ्या जिल्ह्यातील योगासन खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रोहन तायडे, प्रणव साळवे, तृप्ती गोरे, ऋद्धी भावे, सिद्धी चोरे आणि प्रांजल वाघाणी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षक मंगेश खोपकर, मृणाली वाघोले, रेशमा शर्मा तसेच तांत्रिक अधिकारी उमेश झोटिंग, कुलदीप काकडे आणि प्रणिता तरोटे-कवडे यांचाही गौरव करण्यात आला. या सोहळ्यात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंनी संगीताच्या तालावर नृत्याद्वारे योगाचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.

