शहरात रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नियोजनाचा आढावा
रिपब्लिकन पक्षात ना. आठवले यांच्या नेतृत्वाखाली सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र यावे -सुनिल साळवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (दि. 20 जून) शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांसह सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या 7 जुलै रोजी होणाऱ्या शेवगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापक नियोजन करण्यात आले. यावेळी शेवगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या दक्षिण जिल्हा संकल्प मेळाव्याबरोबरच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी, उपस्थिती वाढविण्यासाठी आखण्यात येणारी रणनीती आणि जनसंपर्क अभियानावर चर्चा झाली.
बैठकीत विविध तालुके, शहर व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावागावांत बैठका घेणे, युवक व महिला कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शेवगाव येथील कार्यक्रमात रिपब्लिकन पक्ष नगर दक्षिणच्या वतीने ना. आठवले यांची केंद्रात राज्य मंत्रीपद तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल व राज्यसभा सदस्यपदी तिसऱ्यांदा नियुक्ती झाल्याबद्दल नागरी सत्कार केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी रिपब्लिकन पक्षातील राज्याचे प्रमुख पदाधिकारी व मित्र पक्षाच्या सर्व नेत्यांना निमंत्रित करण्याचे नियोजन देखील बैठकीत करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, विलास साठे, गणेश कदम, मगरे सर, अंबादास अरोळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, अमित काळे, युवक शहराध्यक्ष राहुल कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, महिला तालुकाध्यक्षा कविता नेटके, महिला शहर जिल्हाध्यक्ष मायाताई जाधव, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पुंडलिक गंगावणे, अशोक शिरसिंग, सोनवणे मामा, युवराज गायकवाड, बापू जावळे, शुभम गायकवाड, शुभम ठोफ्लबे, आंग्रे तार्इ, जयराम आंग्रे, यशराज शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अशोक गायकवाड म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाच्या विचारधारेचा प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाची लढाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद सातत्याने वाढत असून, आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने कार्य करावे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की, शेवगाव येथे होणारा दक्षिण जिल्हा संकल्प मेळावा हा पक्षाच्या संघटनात्मक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरेल. प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा सामाजिक न्याय, समानता आणि संविधानिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षात ना. आठवले यांच्या नेतृत्वाखाली सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही संघटनात्मक मजबुतीवर भर दिला जाणार आहे.
बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडत आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेवगाव येथील मेळावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा भूमिपूजन सोहळा ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

