अत्यंत खडतर 85.77 किमी अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरित्या केली पूर्ण
डॉ. अमित बडवे यांना प्लॅटिनम पदक; चार धावपटूंनी नगरच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन 2026 स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून परतलेल्या अहिल्यानगरच्या चार धावपटूंचे शहरात उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत दमदार कामगिरी करत शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात उज्ज्वल करणाऱ्या धावपटूंवर नगरकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
दक्षिण आफ्रिकेतील डरबन ते पीटरमारित्झबर्ग या दोन शहरांदरम्यान पार पडलेल्या 85.77 किलोमीटरच्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये अहिल्यानगरचे डॉ. अमित बडवे, जस्मित वधवा, सुनील बनकर आणि सचिन राणे यांनी यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. या धावपटूंना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक संदीप जोशी यांचाही या यशात मोठा वाटा राहिला.
शहरात आगमन होताच धावपटूंचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांच्या गजरात स्वागत करण्यात आले. नगर-पुणे महामार्गावरील अहमदनगर महाविद्यालयाजवळील श्रीदीप हॉस्पिटल येथे आयोजित स्वागत सोहळ्यात क्रीडाप्रेमी, धावपटू, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून धावपटूंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी धावपटूंनीही ढोलाच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला.
स्वागत सोहळ्यापूर्वी सर्व धावपटूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आपल्या यशाचे श्रेय मातृभूमीला आणि शहरवासीयांच्या शुभेच्छांना अर्पण केले. अनेकांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून सत्कार केला. आपल्या कुटुंबीयांशी गळाभेट घेताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी आणि कठीण अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक मानली जाते. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेचे यंदाचे 99 वे वर्ष होते. प्रत्येक वर्षी हजारो धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. यंदा जगभरातील सुमारे 22 हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. भारतातून 250 हून अधिक धावपटूंनी स्पर्धेत भाग घेतला असून, त्यामध्ये अहिल्यानगरच्या चार धावपटूंनी केलेली कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली.
या स्पर्धेत डॉ. अमित बडवे यांनी अवघ्या 9 तास 58 मिनिटांत अंतर पूर्ण करत मानाचे प्लॅटिनम पदक पटकाविले. त्यांची कामगिरी नगरसाठी अभिमानास्पद ठरली. तसेच जस्मित वधवा यांनी 10 तास 7 मिनिटांत, सुनील बनकर यांनी 11 तास 10 मिनिटांत, तर सचिन राणे यांनी 11 तास 53 मिनिटांत ही खडतर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी धावपटूंच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे कौतुक करत, अशा यशस्वी कामगिरीमुळे शहरातील युवकांना क्रीडा क्षेत्राकडे प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेऊन नगरचे नाव जागतिक नकाशावर नेण्याचे काम हे धावपटू करत असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. धावपटूंनी या खडतर मॅरेथॉनमध्ये आलेले अनुभव कथन केले. तर आपल्या यशामागे अनेक महिन्यांची कठोर तयारी, शिस्तबद्ध जीवनशैली, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचे पाठबळ असल्याचे सांगितले. भविष्यात आणखी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन भारत आणि अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

