• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात तुतारीच्या निनादात विद्यार्थ्यांचे स्वागत

ByMirror

Jun 16, 2026
नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साही वातावरणात प्रारंभ

नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साही वातावरणात प्रारंभ


कोपरगाव (प्रतिनिधी)- कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव, नवोदित विद्यार्थी स्वागत समारंभ, पाठ्यपुस्तक वितरण व शाळेच्या माहिती पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता पहिली तसेच इतर वर्गांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, औक्षण करून व पुष्पवृष्टी करत तुतारीच्या निनादात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजविण्यात आलेला परिसर, आनंदी वातावरण आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती.


यावेळी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये नव्याने निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संदीप वर्पे व सुरेश बोळीज यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्कूल कमिटी सदस्य म्हणून निवड झालेल्या पद्माकांत कुदळे, रमेश गवळी, अंबादास वडांगळे आणि बाळासाहेब रुईकर, अशोक आवटे, यांचाही सन्मान करण्यात आला.


यावेळी मनोगत व्यक्त करताना सुरेश बोळीज यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत चांगले संस्कार, शिस्त आणि सामाजिक मूल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन केले. शिक्षण ही समाज परिवर्तनाची प्रभावी शक्ती असून पालक, शिक्षक आणि संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते, असे त्यांनी सांगितले.


पद्माकांत कुदळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाची गौरवशाली परंपरा, शिक्षकांचे समर्पित कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेची बांधिलकी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यालयाची वाटचाल, शैक्षणिक कार्य, विविध उपक्रम आणि भावी उद्दिष्टांचा आढावा देणाऱ्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत नव्या शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रभारी मुख्याध्यापक गजानन जाधव यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *