• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

शाळेच्या पहिल्या दिवशी फुलांचा वर्षाव, तुतारीचा निनाद अन्‌ कार्टूनसह विद्यार्थ्यांची धमाल

ByMirror

Jun 16, 2026
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; आकाशात फुगे सोडून जल्लोष

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; आकाशात फुगे सोडून जल्लोष


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त सोमवारी (दि. 15 जून) कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. फुलांच्या वर्षावात, तुतारीच्या मंगल निनादात आणि विद्यार्थ्यांच्या आवडत्या कार्टून पात्रांच्या उपस्थितीत शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद, उत्साह आणि जल्लोषाचा अनोखा अनुभव घेतला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेच्या परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे खास आकर्षण ठरलेल्या कार्टून पात्रांनी प्रवेशद्वारावर उभे राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आपल्या आवडत्या कार्टूनसोबत हस्तांदोलन करताना आणि छायाचित्रे काढताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे आगमन होताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तुतारीच्या गजराने आणि टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्याने संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला. अनेक दिवसांच्या सुट्टीनंतर मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता.


या स्वागत समारंभासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अनिलराव साळुंके, स्कूल कमिटी सदस्य अंबादास गारुडकर, ॲड. रविंद्र शितोळे, श्‍यामराव व्यवहारे, माजी नगरसेवक संजय घुले, विष्णूपंत म्हस्के, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख मिनाक्षी खोडदे, स्वाती गारुडकर आंदीसह पालक प्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले. या उपक्रमामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचा संदेश उत्साहपूर्ण वातावरणात देण्यात आला.


प्रास्ताविक करताना माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांनी शाळेत दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने वाढावी यासाठी शाळा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळेच्या गुणवत्तेचा सातत्याने वाढणारा आलेखही त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडला. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत अभ्यास, शिस्त आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.


यावेळी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन पुस्तके मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. वर्गात विद्यार्थ्यांचे काही हसरे व नवोदितांचे रडणारे चेहरे देखील होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागत समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पिसाळ व प्रदीप पालवे यांनी केले. राजेंद्र देवकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *