मनोरंजक खेळांचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद; औक्षण, फुगे आणि चॉकलेट्सने विद्यार्थी भारावले
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ ज्ञान संपादन आणि अभ्यासासाठी करावा -अरुण पालवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक, माध्यमिक व बालक मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी आकर्षक सजावट, औक्षण, चॉकलेट वाटप, मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच विविध मनोरंजक खेळांची व्यवस्था करण्यात आल्याने शाळा परिसर आनंद, उत्साह आणि नव्या उमेदीनं फुलून गेला.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर फुग्यांनी सजलेली आकर्षक स्वागत कमान उभारण्यात आली होती. संपूर्ण परिसर रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. प्रत्येक वर्गात फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणाचा अनुभव मिळाला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक औक्षण करून स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांची व्यवस्था करण्यात आली होती. जम्पिंग पॅड आणि एअर स्लाइड यांसारख्या खेळांवर विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट्स देऊन त्यांच्या आनंदात भर घालण्यात आली. शाळेने उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणी आणि पालकांसमवेत छायाचित्रे काढत या संस्मरणीय दिवसाच्या आठवणी जपल्या.
या स्वागत सोहळ्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाचे सावेडी केंद्र समन्वयक अरुण पालवे यांच्यासह विविध मान्यवर व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे यांनी प्रास्ताविकातून शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांची माहिती दिली.
अरुण पालवे म्हणाले की, विद्यार्थ्यांना मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “आजच्या काळात सोशल मीडियावर स्वतःची प्रतिमा चांगली दाखविण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्ष आयुष्यातील नाती आणि संवाद कमी होत चालले आहेत. अभासी जगात समाज अधिकाधिक गुंतत असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावरही होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ ज्ञान संपादन आणि अभ्यासासाठी करावा. खरे यश सोशल मीडियावर मिळत नाही, तर सातत्यपूर्ण मेहनत, उत्तम शिक्षण आणि शिस्तबद्ध जीवनशैलीतून मिळते.”
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ अत्यंत आवश्यक आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सातत्य, मेहनत आणि योग्य दिशा आवश्यक असते. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शक असतात आणि यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी श्रमिकनगर परिसरात व्यापक गृहभेट अभियान राबविले होते. पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना शाळेत नियमित उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती नोंदविण्यात आली. नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थीही आनंदाने शाळेत दाखल झाले.
विद्यार्थ्यांच्या उत्साही आणि आनंदी चेहऱ्यांमुळे संपूर्ण शाळा परिसर चैतन्यमय झाला होता. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. हा स्वागत सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

