सर्व सामने जिंकत पटकाविले अजिंक्यपद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अशोकभाऊ फिरोदिया स्कूल मैदानावर झालेल्या अहिल्यानगर प्रीमियर फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल क्लब संघाने सुमन फुटबॉल क्लबचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
सामन्याच्या सुरुवातीलाच फिरोदिया शिवाजियन्सने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. अभय साळवे आणि मयूर गोरखा यांनी प्रत्येकी 1 गोल करत संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. सुमन एफसीच्या अविनाश शिंदे याने 1 गोल करून फरक कमी केला, मात्र फिरोदिया शिवाजियन्सने आघाडी कायम राखत 2-1 असा विजय मिळवला.
नमोह एफसी आयोजित या स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स एफसीने स्पर्धेतील सर्व 4 सामने जिंकत अजिंक्य राहून विजेतेपद संपादन केले. संघाच्या शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळामुळे त्यांना या यशावर शिक्कामोर्तब करता आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार फिरोदिया शिवाजियन्सच्या मयूर गोरखा व रोशन रिकामे यांना प्रदान करण्यात आला. बाटा एफसीच्या कामरान रंगरेज याने सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा पुरस्कार पटकावला, तर सुमन एफसीच्या ओंकार डोंगरे याला उत्कृष्ट गोलरक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय सहभागी प्रत्येक संघातील एका उत्कृष्ट खेळाडूचाही सत्कार करण्यात आला.

