• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

सकारात्मक संज्ञान-क्रांतीसाठी ‘पसायदान भक्ती-ज्ञान-कर्म पीठ’ स्थापन

ByMirror

Jun 14, 2026
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

सेवा, विज्ञान आणि विवेकाचा जागर; भक्तीपासून कर्मभक्तीकडे, अंधश्रद्धेपासून विज्ञानाकडे वाटचाल


पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने “पसायदान भक्ती-ज्ञान-कर्म पीठ” स्थापन करण्याची जनहित घोषणा करण्यात आली आहे. सर्व सजीवांचे कल्याण, निसर्गसंवर्धन, युवकांची सकारात्मक संज्ञान-क्रांती, जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती यांचा संगम घडवून आणणे, हे या पीठाचे प्रमुख ध्येय आहे. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या जन्मदिनानिमित्त हा उपक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


ज्ञानेश्वर माऊलींचे ‘पसायदान’ हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत पसायदानाकडे केवळ भक्तिपर प्रार्थना म्हणून न पाहता, लोककल्याणाचा कृतीशील कार्यक्रम म्हणून पाहण्याची गरज आहे, असे या घोषणेत नमूद करण्यात आले आहे. “जो जे वांछिल तो ते लाहो” ही ओळ केवळ वैयक्तिक इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा नसून, प्रत्येक सजीवाला अन्न, पाणी, शुद्ध हवा, सन्मान, सुरक्षा आणि समान जीवनसंधी मिळाली पाहिजे, या व्यापक सामाजिक जबाबदारीची घोषणा आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.


या पार्श्वभूमीवर स्थापन होणारे ‘पसायदान भक्ती-ज्ञान-कर्म पीठ’ हे भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम घडविणारे लोकचळवळीचे केंद्र म्हणून कार्य करणार आहे. भक्तीद्वारे अंतःकरण शुद्ध करणे, ज्ञानाद्वारे विवेक आणि जागृती निर्माण करणे, तसेच कर्माद्वारे समाज आणि निसर्गाची सेवा करणे, हे या पीठाचे मूलभूत ध्येय राहणार आहे.


पीठाच्या संकल्पनेनुसार भक्ती म्हणजे कर्मकांड, अंधश्रद्धा किंवा संकुचित धार्मिकता नव्हे. सर्व सजीवांबद्दल करुणा, निसर्गाबद्दल कृतज्ञता आणि मानवी प्रतिष्ठेबद्दल निष्ठा, हीच खरी भक्ती आहे. जी भक्ती माणसाला माणसापासून दूर नेते, जात-धर्माच्या भिंती निर्माण करते किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालते, ती खरी भक्ती असू शकत नाही. उलट जी भक्ती समाजाला जोडते, सर्वांच्या कल्याणाचा विचार करते आणि सेवेला सर्वोच्च स्थान देते, तीच खरी भक्ती असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
“निसर्गसेवा हीच भक्ती, मानवसेवा हीच भक्ती आणि सर्वजीव कल्याण हीच खरी भक्ती” या तत्त्वावर या पीठाचे कार्य उभे राहणार आहे. पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन, वृक्षारोपण, सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्यांची जपणूक यासाठी युवकांना सक्रियपणे जोडण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.


युवकांसमोरील आजची सर्वात मोठी समस्या केवळ बेरोजगारी किंवा स्पर्धा नसून, चुकीच्या मानसिक साच्यांची आहे, असेही या घोषणेत नमूद करण्यात आले आहे. जातीयता, अंधश्रद्धा, मतदास्य, द्वेष, व्यसनाधीनता, डिजिटल गुलामी आणि निसर्गापासून तुटलेले जीवन यांसारखे घटक युवकांच्या विचारविश्वावर गंभीर परिणाम करत आहेत. हे सर्व ‘अजनुकीय माहिती’ अर्थात नॉन-जेनेटिक इन्फॉर्मेशनचे प्रकार असून, ते समाजाच्या प्रगतीस अडथळा ठरत आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले.


या समस्यांवर उपाय म्हणून पीठाने युवकांसाठी तीन मूलभूत सूत्रे मांडली आहेत — ओळखा, तपासा आणि बदला. प्रथम, आपल्या मनातील चुकीच्या समजुती आणि विचारसरणी ओळखा. दुसरे, त्या विज्ञान, विवेक, संविधानिक मूल्ये आणि मानवी प्रतिष्ठेच्या निकषांवर तपासा. तिसरे, सातत्यपूर्ण सरावातून त्यांचे रूपांतर सर्वकल्याणकारी आणि सकारात्मक विचारांमध्ये करा. हीच खरी ‘सकारात्मक संज्ञान-क्रांती’ असल्याचे या घोषणेत स्पष्ट करण्यात आले आहे.


अण्णा हजारे यांच्या कार्याचा उल्लेख करताना ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, लोकशक्ती जागृत झाली तर गाव बदलू शकते, प्रशासन जबाबदार बनू शकते आणि समाजात नैतिक दबाव निर्माण होऊ शकतो. ग्रामविकास, जलसंधारण, स्वच्छता, लोकसहभाग आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृती या क्षेत्रांतील अण्णा हजारे यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त स्थापन होणारे हे पीठ व्यक्तिपूजेपेक्षा मूल्यपूजा, अंधश्रद्धेपेक्षा विज्ञाननिष्ठा आणि निष्क्रिय भक्तीपेक्षा कर्मभक्तीचा संदेश देणारे ठरेल.


ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान, अण्णा हजारे यांचा सेवाभाव आणि विवेकपूर्ण चेतना-सिद्धांत यांचा संगम म्हणजेच ‘पसायदान भक्ती-ज्ञान-कर्म पीठ’ असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले. भारतातील तरुण पिढीच्या चेतनेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, निसर्गाशी नवे नाते निर्माण करणे आणि सर्व सजीवांच्या कल्याणासाठी कार्य करणे, हेच या पीठाचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेसाठी ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *