• Sat. Jun 6th, 2026

पोलिसांच्या कथित हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या?

ByMirror

Jun 6, 2026

बेलवंडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; मृताच्या पत्नीचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन


‘तक्रार घेतली नाही, अपमान केला आणि न्याय नाकारला’ शैलाबाई चव्हाण यांचा आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बेलवंडी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेत न्याय न देता वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याने आणि तक्रारीची दखल न घेतल्याने माझे पती किरतमल झरलाल चव्हाण यांनी नैराश्‍यातून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप मृताच्या पत्नी शैलाबाई किरतमल चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


शैलाबाई चव्हाण या श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावच्या रहिवासी असून, त्या पती व दोन मुलांसह शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या निवेदनानुसार, शेजारी राहणारे भावबंधू यांच्याशी मागील काही वर्षांपासून वाद सुरू होता.


दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे भावबंधू यांनी दारूच्या नशेत शैलाबाई व त्यांचे पती किरतमल चव्हाण यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. वाद टाळण्यासाठी दोघे शेतात कांदे काढण्यासाठी जात असताना सदर व्यक्तीने त्यांचा रस्ता अडवून मारहाण केली. या हल्ल्यात शैलाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यातून रक्तस्राव सुरू झाला होता. तसेच जीवे मारण्याची व संपूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची धमकीही दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


घटनेनंतर त्याच दिवशी सायंकाळी सुमारे सात वाजता पती-पत्नी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यांची तक्रार न घेता अपमानास्पद शब्दांत बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे. “उद्या सकाळी या, आज तक्रार घेता येणार नाही,” असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आल्याचे शैलाबाई यांनी म्हटले आहे. यामुळे निराश होऊन दोघे घरी परतले. मात्र, रात्री पुन्हा भावबंधू यांची पत्नी आणि मुलांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ भीतीपोटी त्यांच्या लहान मुलाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचेही निवेदनात नमूद आहे.


दुसऱ्या हल्ल्यानंतर रात्री सुमारे दहा वाजता किरतमल चव्हाण पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले. मात्र, पोलीस निरीक्षक यांनी तांत्रिक कारण सांगून तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, 23 एप्रिल रोजी सकाळी पुन्हा तक्रार देण्यासाठी गेल्यानंतरही एका पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ करून हाकलून दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर संबंधितांकडून वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. “पोलीस आम्ही विकत घेतले आहेत, तुमचे काहीही वाकडे होणार नाही,” असे सांगून मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या सततच्या त्रासामुळे शैलाबाई व त्यांचे पती माहेरी राहण्यासाठी गेले होते. दरम्यान, 30 एप्रिल 2026 रोजी भावबंधू याने त्यांच्या मुलाला धमकीचा रील पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार समजल्यानंतर किरतमल चव्हाण अधिकच मानसिक तणावाखाली गेले. “पोलीस मदत करत नाहीत. विरोधकांनी पोलीस विकत घेतले आहेत,” अशी खंत त्यांनी कुटुंबीयांजवळ व्यक्त केल्याचे शैलाबाई यांनी निवेदनात म्हटले आहे. अखेर वाढत्या नैराश्‍यातून 30 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7.45 वाजता किरतमल चव्हाण यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे.


या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, बेलवंडी पोलीस स्टेशनमधील संबंधित तारखांचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपासण्यात यावे, तसेच पोलीस निरीक्षक आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ विभागीय कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी शैलाबाई चव्हाण यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *