दोन गटांतील वाद पाहण्यासाठी गेलेल्या जयराम आंग्रे यांना सात-आठ जणांकडून बेदम मारहाण; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील देहेरे गावात दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादाकडे पाहण्यासाठी गेलेल्या एका युवकावर नऊ जणांच्या टोळक्याने कोयते आणि बेसबॉलच्या दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले रिपब्लिकन पक्षाचे युवक नगर तालुकाध्यक्ष जयराम सुरेश आंग्रे यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, हल्लेखोरांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जखमी जयराम आंग्रे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 1 जून) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास देहेरे गावात दोन गटांमध्ये वाद सुरू होता. यावेळी चौकात बसलेल्या जयराम आंग्रे यांना मोठा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकू आल्याने ते नेमके काय घडत आहे हे पाहण्यासाठी घटनास्थळाच्या दिशेने गेले. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र अजय रोकडे हे देखील होते.
अंगणवाडीसमोर पोहोचताच एका गटातील सात ते आठ जणांचे टोळके अचानक त्यांच्या अंगावर धावून आले. सुरू असलेल्या भांडणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगूनही संबंधितांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. हल्लेखोरांनी हातातील कोयते आणि बेसबॉलच्या दांडक्यांनी बेछूट मारहाण केल्याचा आरोप आंग्रे यांनी केला आहे.
या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर, डोक्यावर आणि शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापती झाल्या. कोयत्याने वार करण्यात आल्याने तसेच दांडक्यांनी मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हल्लेखोरांपैकी काही जण खासदाराचे कार्यकर्ते असल्याने पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप जखमी युवकाने केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी जयराम आंग्रे यांनी केली आहे. तसेच, जर आरोपींवर कारवाई करण्यात आली नाही, तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
