• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पण

ByMirror

May 29, 2026
नगर शहराचा 536 वा स्थापना दिवस साजरा

नगर शहराचा 536 वा स्थापना दिवस साजरा

ऐतिहासिक वारसा हेच नगरकरांचे वैभव -साहेबान जहागीरदार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहराचा 536 वा स्थापना दिवस गुरुवारी (दि. 28 मे) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनच्या वतीने चादर अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराच्या ऐतिहासिक वैभवाची आठवण करून देत नगरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला उजाळा देण्यात आला.


या कार्यक्रमास आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, मौलाना शफिक कासमी, नगरसेवक हाजी शैबाज, शैबाज बॉक्सर, शहानवाज शेख, फिरोज पठाण, फिरोज आर्किटेक, तनवीर तांबोळी, आयान शेख, मुजम्मिल शेख, शाहिद मोमीन, जीशान शेख, साहिल सय्यद आदींसह मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी व युवक उपस्थित होते. उपस्थितांनी शहराच्या स्थापनेचा इतिहास आणि नगरच्या वैभवशाली परंपरेबद्दल अभिमान व्यक्त केला.


साहेबान जहागीरदार म्हणाले की, शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा हे प्रत्येक नगरकरासाठी अभिमानाचे प्रतीक आहे. संस्थापक अहमद निजामशहा यांच्या दूरदृष्टीमुळे हे वैभवशाली शहर उभे राहिले. एकेकाळी कैरो आणि बगदादसारख्या ऐतिहासिक शहरांच्या तोडीचे महत्त्व आणि ओळख आपल्या शहराला होती. जगातील फार कमी शहरांचे स्थापना दिन निश्‍चित माहित आहेत आणि त्यापैकी एक शहर म्हणजे अहमदनगर होय. अहमद निजामशहा यांनी 28 मे 1490 रोजी या शहराची स्थापना केली होती, याचा नगरकरांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, त्या काळात उभारण्यात आलेली खापरी पाणी नळ योजना ही सर्वांसाठी आकर्षणाचा विषय होती. शहराचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. नगरला समृद्ध इतिहास, वास्तूंचा ठेवा आणि उच्च प्रतिभावान व्यक्तींची परंपरा लाभली आहे. भविष्यात शहराला पुन्हा एकदा जुने वैभव प्राप्त व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


मौलाना शफिक कासमी यांनी देखील शहराच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देताना नगरच्या ऐतिहासिक घटनांचा आढावा घेतला. शहराची सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक महत्त्व आणि सामाजिक एकात्मता जपण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करण्यात आले. युवकांनी इतिहास जतन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *