जैवविविधता नेगेन्ट्रॉपी मोहिमेतून महाराष्ट्रातील दोन लाख हेक्टर जमीन हिरवीगार करण्याचा निर्धार; पीपल्स हेल्पलाईनचा प्रस्ताव
भूमिगत ओलाशय, वृक्षसंवर्धन आणि लोकविज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा मार्ग.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक हेक्टर उजाड, कोरडी आणि निर्जीव झालेली जमीन पुन्हा हिरवीगार करण्यासाठी “जैवविविधता नेगेन्ट्रॉपी हरित क्रांती” राबविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने मांडण्यात आला आहे. स्थानिक लोकविज्ञान, नैसर्गिक साधने आणि पावसाच्या पाण्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन यांच्या माध्यमातून ही क्रांती उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे फळांनी लगडलेली झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट, फुलपाखरांचे नृत्य आणि समृद्ध परिसंस्था पुन्हा निर्माण होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी त्यातील बहुतांश पाणी वाहून जाते किंवा उन्हामुळे बाष्पीभवन होते. परिणामी जमिनीत पुरेशा प्रमाणात पाणी मुरत नाही आणि ओलाशय टिकत नाही. यामुळे जमीन कोरडी पडते, शेतीची उत्पादकता घटते, विहिरी कोरड्या होतात आणि जैवविविधतेचा ऱ्हास होतो. अनेक भागांत जमीन मृत प्रदेशासारखी दिसू लागल्याने पर्यावरणासह शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
या गंभीर समस्येवर उपाय म्हणून “रेन गेन बॅटरी”, “बारमाही भूमिगत ओलाशय” आणि “जैवविविधतेवर आधारित वृक्षसंवर्धन” “निगेन्ट्रापी “या तीन संकल्पना पुढे आणण्यात आल्या आहेत. प्रत्येक झाडाजवळ जमिनीखाली पावसाचे पाणी साठवून ठेवणारी विशेष नैसर्गिक रचना तयार करण्याची कल्पना मांडण्यात आली आहे. दगड, वाळू, झाडं मुरूम, आणि इतर नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार होणाऱ्या या व्यवस्थेला “भूमिगत पावसाची बॅटरी” असे संबोधण्यात आले आहे.
पाऊस पडताच हे पाणी थेट जमिनीत साठवले जाते. त्यामुळे पाणी वाहून जात नाही किंवा उन्हामुळे वाफ बनून उडून जात नाही. हे पाणी हळूहळू जमिनीत मुरत राहते आणि झाडांच्या मुळांना बाराही महिने आवश्यक ओलावा पुरवते. एका पावसाळ्यात साठवलेले पाणी संपूर्ण वर्षभर झाडांना जगण्याची ओल पुरवठा देऊ शकते, असा दावा या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
पूर्वी पावसाचे मोठे प्रमाण वाया जात असल्याने जमिनीत ओलावा टिकत नव्हता. त्यामुळे झाडांची वाढ खुंटत होती आणि शेतकऱ्याला स्थिर उत्पन्न मिळत नव्हते. मात्र “रेन गेन बॅटरी” पद्धतीमुळे पाणी मोठ्या प्रमाणावर जमिनीत मुरेल, भूमिगत ओलावा टिकून राहील आणि झाडांच्या जगण्याची क्षमता वाढेल. यामुळे फळझाडे, औषधी वनस्पती, सावली देणारी वृक्षराजी आणि जैवविविधतेला पोषक परिसंस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या हरित मोहिमेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक स्रोतांमधून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. फळबागांमधून वर्षभर उत्पन्न मिळू शकेल. मधमाशांच्या पालनातून शुद्ध मध उत्पादन होईल. गांडूळखतातून सेंद्रिय खत तयार करून त्याची विक्री करता येईल. औषधी वनस्पतींच्या लागवडीमधूनही स्वतंत्र उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी मोठे कालवे, महागडी यंत्रणा, रासायनिक खते किंवा प्रचंड भांडवलाची आवश्यकता भासणार नाही. निसर्गालाच शेतकऱ्याचा भागीदार बनविणारी ही संकल्पना असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले.
या मोहिमेसाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हु सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीर बहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील असून राज्यभर ही संकल्पना पोहोचविण्यासाठी जनजागृती मोहिमाही राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
