अहिल्यानगरात हरित संकल्प मोहिमेला दमदार सुरुवात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याचा संदेश.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाला तसेच राज्य शासनाच्या हरित उपक्रमांना प्रतिसाद देत अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवारी “नो व्हेईकल डे” उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी दिसून आली. अनेक अधिकारी व कर्मचारी सायकल, इलेक्ट्रिक वाहन, सार्वजनिक वाहतूक तसेच पायी कार्यालयात पोहोचले.

विशेष म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते,जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक सुरेश आघाव यांनी स्वतः सायकलवरून कार्यालयात येत तसेच उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, गौरी सावंत, तहसीलदार शोभा पुजारी, तहसीलदार संचेती यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट चा वापर करून नंतर कार्यालयात पायी चालत येत उपक्रमात सहभाग नोंदविला. त्यांच्या या कृतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यालयात सायकल, इलेक्ट्रिक बाइक व पायी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा अहिल्यानगर तसेच महसूल संघटनेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. “उद्या आपली गाडी घरीच थांबणार” हा निर्धार करत कर्मचाऱ्यांनी इंधन बचतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी “एक कर्मचारी – एक वृक्ष दत्तक” ही संकल्पनाही मांडण्यात आली. आगामी पावसाळ्यात केवळ वृक्षारोपण न करता प्रत्येक कर्मचाऱ्याने लावलेले झाड जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच शासकीय कार्यालय परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी दर महिन्याला सायकल रॅली, ट्रेकिंग, योग, ध्यानधारणा व सुदर्शन क्रिया सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
या उपक्रमाला मा. जिल्हाधिकारी, मा. अप्पर जिल्हाधिकारी, मा. निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी सक्रिय पाठिंबा दिला. वरिष्ठ अधिकारी स्वतः सहभागी झाल्याने कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
या प्रसंगी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष अशोक अलका सूर्यभान मासाळ, महिला जिल्हाध्यक्षा सौ. वंदना नेटके यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
