• Tue. May 19th, 2026

वाळकी मधील वाळुंबा नदीवरील मुख्य पूल आणि लेंडी पूल बनले धोकादायक

ByMirror

May 18, 2026

पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करून नवीन, मजबूत आणि उंच पूल उभारावे -विजय भालसिंग


पूराने गावाचा संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील वाळकी गावाजवळील वाळुंबा नदीवरील मुख्य पूल आणि लेंडी पूल यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, मागील वर्षीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीनंतरही अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. आगामी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या पुलांची तातडीने दुरुस्ती करून नवीन, मजबूत आणि उंच पूल उभारावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केली आहे.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळकी गावाला मोठ्या पुराचा फटका बसला होता. संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला होता. या पुरामध्ये अनेक जनावरे वाहून गेली होती. गाय, म्हैस आणि शेळ्यांचे मोठे नुकसान झाले होते. काही ठिकाणी जीवितहानी झाल्याच्याही घटना घडल्या होत्या. या नैसर्गिक आपत्तीनंतरही पुलांच्या प्रश्‍नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


वाळुंबा नदीवरील मुख्य पूल आणि लेंडी पूल हे गावासाठी अत्यंत महत्त्वाचे दळणवळणाचे मार्ग आहेत. मात्र सध्या दोन्ही पुलांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पुलाच्या अनेक भागांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी संरचना खचल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात मुरूम आणि डबर टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी मुसळधार पाऊस झाल्यानंतर ही मलमपट्टी पुन्हा वाहून जाण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

वाळुंबा नदीला जोडलेल्या लेंडी पुलाची दुरावस्था


नदीचे पात्र मोठे असून परिसरातील अनेक ओढे आणि नाले या नदीला येऊन मिळतात. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतो. अशा परिस्थितीत पूलावरून पाणी वाहू लागल्यास गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. अनेक लहान-मोठ्या वस्त्यांमधील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच रुग्णवाहिकांनाही मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते.


ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानंतर पुलांवर किरकोळ दुरुस्ती करण्यात आली; मात्र हा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळा जवळ आला की ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. ग्रामस्थांमधून पुलाची उंची वाढवून नवीन पूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे. सध्याचे पूल अरुंद आणि कमी उंचीचे असल्याने पाण्याचा वेग वाढला की वाहतुकीस मोठा धोका निर्माण होतो. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्‍यकता व्यक्त होत आहे.


सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी या प्रश्‍नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “हा ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्‍न आहे. राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी निर्णय घेणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळे तातडीने नवीन पूल उभारावा किंवा सध्याच्या पुलांची कायमस्वरूपी दुरुस्ती करून ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *