भूमिगत ओलाशय तंत्रज्ञानाने वाचणार शहरातील वड, पिंपळ, कडुनिंब;
दीन दयाल परिवार प्रतिष्ठान, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार; शहरात पहिल्या टप्प्यात 25 झाडांचे होणार संवर्धन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरांमध्ये वाढत चाललेल्या सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांमुळे जुनी व विशाल झाडे धोक्यात आली असून त्यांच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचा मार्ग बंद झाल्याने झाडांच्या मुळांना आवश्यक ओलावा मिळेनासा झाला आहे. परिणामी दशके, कधी-कधी शतके पर्यावरणाची सेवा करणारी वड, पिंपळ, कडुनिंब यांसारखी झाडे हळूहळू कोमेजत चालली आहेत. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून दीन दयाल परिवार प्रतिष्ठान, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने “भूमिगत रेन गेन बॅटरी (ओलाशय)” ही अभिनव आणि वैज्ञानिक संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.
जनतेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, शहरातील जुन्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, “सिमेंटचे रस्ते थांबविणे आजच्या घडीला शक्य नाही; मात्र शहराची हरित निसर्गसंपत्ती निश्चितपणे वाचवता येऊ शकते. या योजनेचा संपूर्ण खर्च ट्रस्ट उचलणार आहे.”
शहरांमधील सिमेंट आणि काँक्रीटचे रस्ते पूर्णतः अभेद्य असल्यामुळे पावसाचे सुमारे 90 टक्के पाणी थेट वाहून जाते. जमिनीत पाणी मुरत नसल्याने भूजल पातळी घटते आणि झाडांच्या मुळांपर्यंत ओलावा पोहोचत नाही. उरलेले थोडेफार पाणी उन्हाळा आणि वाऱ्यामुळे लगेच बाष्पीभवन होते. पूर्वी जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यावर टिकून असलेली झाडे आता पावसाळ्यातही तहानलेली राहतात. या परिस्थितीत वेळीच उपाय न केल्यास शहरातील अनेक जुनी झाडे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यावर उपाय म्हणून “रेन गेन बॅटरी” ही भूमिगत संरचना तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक झाडापासून सुमारे पाच फूट अंतरावर चार फूट लांब, चार फूट रुंद आणि आठ फूट खोल असा खड्डा तयार केला जाणार आहे. या खड्ड्यात मोठ्या दगडांपासून ते बारीक वाळूपर्यंत थरांच्या स्वरूपात भराव केला जाईल. वरच्या बाजूस कठीण मुरुमाचे पारगम्य आवरण देण्यात येणार असून त्यामुळे पाणी आत झिरपू शकेल, मात्र पृष्ठभाग स्थिर राहील.
पावसाचे पाणी गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने या बॅटरीमध्ये वळवले जाईल. दगड आणि वाळूच्या थरांतून झिरपलेले पाणी आठ फूट खोलपर्यंत भूमिगत साठवले जाईल. ही ओलावा साठवण व्यवस्था वर्षभर झाडांच्या मुळांना हळूहळू पाणी पुरवत राहील. उन्हाळा आणि वाऱ्यामुळे होणारे बाष्पीभवन जवळपास पूर्णपणे रोखले जाईल. परिणामी पूर्वी वाहून जाणारे आणि उडून जाणारे जवळपास 90 टक्के पाणी आता झाडांच्या उपयोगासाठी जमिनीत साठवले जाणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे केवळ झाडांचे संरक्षणच होणार नाही, तर भूजल पुनर्भरणालाही मोठी मदत होणार आहे. शहरातील तापमान कमी होणे, सावली वाढणे, प्राणवायू निर्मिती, कार्बन शोषण, जैवविविधतेचे संवर्धन आणि मातीची धूप रोखणे अशा अनेक पर्यावरणीय फायद्यांचा लाभ मिळणार आहे. पूरस्थिती आणि पावसाळ्यातील पाण्याचा अनावश्यक प्रवाह कमी होण्यासही या प्रकल्पाची मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, “जुनी झाडे ही केवळ झाडे नाहीत, तर शहराचा सजीव पर्यावरणीय आणि सांस्कृतिक वारसा आहेत. एकदा नष्ट झालेली ही झाडे पुन्हा कोणत्याही मानवी आयुष्यात उभी राहू शकत नाहीत. त्यामुळे शहरी विकासासोबत पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज आहे.”
पहिल्या टप्प्यात शहरातील 25 जुन्या झाडांसाठी रेन गेन बॅटरी उभारण्यात येणार असून या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च दीन दयाल परिवार प्रतिष्ठान ट्रस्ट उचलणार आहे. पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. कारभारी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष म्हणजे, हे तंत्रज्ञान केवळ रस्त्यांलगतच्या झाडांसाठीच नव्हे तर शाळांच्या परिसरात, सोसायट्यांमध्ये, सार्वजनिक उद्यानांमध्ये आणि शहरातील कोणत्याही ठिकाणी वापरता येणार आहे. सिमेंटच्या वाढत्या जंगलातही झाडांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी “रेन गेन बॅटरी” हा प्रभावी, स्वस्त आणि शाश्वत पर्याय ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
