• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

कुत्रे, गाई-म्हशींसह ‘प्रहार’चे जलसंधारण विभागात आंदोलन

ByMirror

Apr 23, 2026
अधिकाऱ्यांच्या दालनात सोडले कुत्रे व जनावरे; एरंडोली तलावासाठी प्रशासनाला घेराव;

अधिकाऱ्यांच्या दालनात सोडले कुत्रे व जनावरे; एरंडोली तलावासाठी प्रशासनाला घेराव;

रखडलेले काम त्वरीत सुरु करण्याची मागणी; 36 महिने उलटूनही काम सुरु होत नसल्याने प्रशासनाच्या अनागोफ्लदीचा संताप व्यक्त

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एरंडोली (ता. श्रीगोंदा) येथील साठवण तलावाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती संघटना व ग्रामस्थांच्या वतीने जलसंधारण विभागाच्या कार्यालयात थेट कुत्रे, गाई व म्हशींसह ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रशासनाला धारेवर धरुन साठवण तलावाचे काम त्वरीत सुरु करण्याची मागणी करण्यात आली. अचानकपणे कार्यालयात आलेले कुत्रे आणि जनवारांमुळे अधिकारी व कर्मचारी गडबडले.


प्रहार जनशक्तीचे जिल्हा समन्वयक विजय भंडारे व जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष पप्पूशेठ जेवले, अविनाश ठाणगे, तालुकाध्यक्ष नानासाहेब पाडते, एरंडोली गावातील सागरभाऊ जठार, भाऊसाहेब बनकर, अण्णासाहेब सोनवणे, नारायणभाऊ भंडारे, राहुल इथापे, राहुल जगताप, सोनवणे, सतीश मोरे, प्रकाश मोरे, राजेंद्र जठार, जयसिंग शेलार, संपत मोरे, विठ्ठल भंडारे, भास्कर भंडारे, संदीप भंडारे, किशोर भंडारे, रणधीर भंडारे, सागर जठार आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.


1972 च्या दुष्काळात बैलगाडीच्या साहाय्याने एका वर्षात पूर्ण झालेल्या तलावाच्या कामाला आजच्या आधुनिक युगात 36 महिने उलटूनही पूर्ण करता आले नाही, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. “इतकी यंत्रसामग्री, कोट्यवधींचा निधी असूनही काम ‘जैसे थे’ आहे,” असा आरोप करण्यात आला.

या तलावासाठी 5 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर असूनही काम ठप्प आहे. पोकलेन, जेसीबीसारखी यंत्रणा उपलब्ध असतानाही प्रशासनाने कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. काही स्थानिक अतिक्रमणाचे कारण पुढे केले जात असले तरी त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने प्रश्‍न अधिकच चिघळला आहे.


जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने पाठपुरावा करत आहोत, मात्र अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. आता ही झोप मोडावी लागेल. आज आम्ही कुत्रे घेऊन आलो आहोत; उद्या कामचुकार अधिकाऱ्यांच्या मागे हीच कुत्री सोडावी लागली तरी मागे हटणार नसल्याचे सांगितले.


विजय भंडारे म्हणाले की, पावसाळा तोंडावर असताना तलावाचे काम अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून शेती उत्पन्न घटलेले आहे आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गावकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने मोजणीसाठी पुढील महिन्याची तारीख दिली असली, तरी ती मान्य नसून तातडीने आणि पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.


“ही लढाई कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून शेतकरी व ग्रामस्थांच्या न्यायासाठी आहे,” असे सांगत आंदोलनकर्त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत आक्रमक भूमिका घेतली. “गरज पडली तर जेलमध्ये जावे लागले तरी चालेल, पण तलावाचे काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही,” असा निर्धार व्यक्त करण्यात आला. सदर मागणीचे निवेदन जलसंधारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *