• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

जात, अंधश्रद्धा व मतदास्य निर्मूलनासाठी २६ एप्रिल रोजी ‘जनलोक एनजीआय क्रांती सत्याग्रह’

ByMirror

Apr 20, 2026

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

फुले-आंबेडकर-गांधी विचारांना विज्ञानाची जोड देत जातिमुक्त भारताचा संकल्प

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचा अंत केवळ कायदे किंवा भाषणांद्वारे होणार नाही, तर मानवी मेंदूमधील ‘नॉन-जेनेटिक इन्फॉर्मेशन’ (NGI) बदलल्यानेच शक्य आहे, असा ठाम दावा करत पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने दि. २६ एप्रिल रोजी अहिल्यानगर येथे ‘जनलोक एनजीआय क्रांती सत्याग्रह’ आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून जात, अंधश्रद्धा व मतदास्य निर्मूलनासाठी राष्ट्रव्यापी वैचारिक उठाव उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


या सत्याग्रहामागे ऐतिहासिक विचारांना विज्ञानाची जोड देणारा ठोस पाया असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ‘विद्येविना मती गेली’ म्हणत अज्ञानाविरुद्ध लढा दिला. एनजीआय संकल्पना ही त्यांच्या सत्यशोधक विचारांची आधुनिक वैज्ञानिक आवृत्ती मानली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेचा मानसिक पातळीवर अंत करण्याचा मार्ग दाखवला, तर महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाद्वारे आत्मशक्ती जागवली. एनजीआय सत्याग्रह हा त्या आत्मजागृतीचा वैज्ञानिक विस्तार मानला जात आहे.


पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, १९५३ मध्ये जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी डीएनएच्या रचनेचा शोध लावला. त्यानुसार कोणत्याही मानवात जात दर्शवणारे ‘जीन्स’ नसतात. त्यामुळे जात ही जैविक नसून मानसिक असून ती ‘नॉन-जेनेटिक इन्फॉर्मेशन’ स्वरूपात मेंदूत साठवली जाते. पालकांकडून मुलांकडे जात रक्ताने नाही, तर शब्द, संस्कार आणि सामाजिक प्रभावातून जाते.
न्यूरोप्लास्टिसिटी या वैज्ञानिक संकल्पनेनुसार, नवीन विचार स्वीकारल्यास मेंदूतील रचना बदलू शकते. “जर ‘मी अमुक जातीचा आहे’ हा विचार मेंदूतून काढून टाकला, तर जात अस्तित्वात राहणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. सत्याग्रहाचे उद्दिष्ट मतदास्यापासून मानवमुक्तीकडे नेणारे असल्याचे त्यांनी सांगितले.


जातीनुसार मतदान करणारा मतदार हा ‘प्रोग्राम्ड’ असतो; एनजीआय सत्याग्रहातून तो ‘जागृत नागरिक’ बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. जातीव्यवस्थेमुळे देशाची कार्यक्षमता विभागली गेली असून, विज्ञानाधारित विचारांमुळे समाज एकसंध झाल्यास सामाजिक गोंधळ कमी होऊन विकासाला गती मिळेल, असेही नमूद करण्यात आले.
या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ‘जनलोक संडे स्कूल’ सुरू करण्यात येणार असून, दर रविवारी नागरिकांना जातीमुक्त आणि वैज्ञानिक एनजीआय तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. “शरीर विज्ञानाने समजले; आता मन विज्ञानाने सुधारूया!” हा संदेश घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


१९५३ मध्ये जेनेटिक माहितीचा शोध लागल्यानंतर मानवाच्या शारीरिक रचनेचे गूढ उलगडले. आता एनजीआय संकल्पनेच्या माध्यमातून मानवी मनातील गुलामगिरीचे बंधन तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
या आंदोलनासाठी अशोक सब्बन, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हु सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीर बहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *