• Wed. Apr 15th, 2026

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचे महिलांना पुस्तके वाटप”

ByMirror

Apr 14, 2026

बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचविण्याचा जयंतीचा अभिनव उपक्रम


महिलांनी शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून सक्षम होणे ही काळाची गरज -सुनिल सकट

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनचरित्रावरील पुस्तके महिलांना वाटप करण्यात आली. या उपक्रमाद्वारे बाबासाहेबांच्या विचारांचा घरोघरी प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा उपक्रम राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस सुनिल सकट यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. बाबासाहेबांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.


समाजातील वंचित घटकांना उभारी देणारे बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मार्केटयार्ड परिसरातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महिलांना पुस्तके वाटप करण्यात आली. या वेळी अशोक शिंदे, भाजपा शहर जिल्हा सचिव डॉ. संदिप पवार, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आनंद राठोड, मानवी हक्क अभियानचे जिल्हा संघटक अशोक भोसले, भाजपा शहर कार्यकारिणी सदस्य दीपक उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.


सुनिल सकट म्हणाले की, बाबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले, संघर्ष केला आणि देशाला एक मजबूत संविधान दिले. बाबासाहेबांनी नेहमीच शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. विशेषतः महिलांनी शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून सक्षम होणे ही काळाची गरज आहे. याच विचारातून आम्ही महिलांना बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावरील पुस्तके वाटप करत आहोत, जेणेकरून त्यांच्या संघर्षाची प्रेरणा प्रत्येक घरात पोहोचेल व त्यांच्या विचाराने भावी पिढी घडेल. समाजातील प्रत्येक घटकाने बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले, तरच खऱ्या अर्थाने सामाजिक समता प्रस्थापित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *