• Wed. Apr 15th, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मिळाली नवदृष्टी

ByMirror

Apr 14, 2026

नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केला बाबासाहेबांचा जयघोष


फिनिक्सच्या शिबिराद्वारे 57 ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने नुकतेच घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून 57 ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाली. पुणे येथे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होवून ज्येष्ठ नागरिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शहरात परतले.


शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करुन त्यांचा जय घोष केला. फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. आगळ्या-वेगळ्या पध्दतीने दृष्टीदोष असलेल्या गरजू घटकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेने त्यांना नवदृष्टी देऊन बाबासाहेबांची जयंती उपेक्षितांना आधार देऊन साजरी करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.


आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीहीन रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी जिल्ह्यात फिनिक्स फाऊंडेशनने मोठी चळवळ उभी केली आहे. दरवर्षी महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त फिनिक्सच्या माध्यमातून शिबिर घेऊन गरजूंवर पुणे येथील के.के. आय बुधराणी मध्ये मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहे. आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीहीन रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी हे शिबिर आधार ठरत आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य दीन-दुबळ्यांसाठी वेचले त्यांच्या कार्याचा आणि विचाराचा वारसा घेऊन फिनिक्स फाऊंडेशन कार्य करत असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले. दर महिन्याला गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले जाते. या शिबीराच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदानाची देखील जनजागृती सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *