स्मारकाला विरोध करणाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी
पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी चांगल्या पध्दतीने लवकरच काम सुरु होणार -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती महात्मा फुले दांम्पत्य स्मारक समितीच्या वतीने साजरी करण्यात आली. माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले यांच्या नियोजित स्मारकाला विरोध करणाऱ्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मनपा आयुक्त यशवंत डांगे, सुरेश इथापे, स्मारक समितीचे प्रा. माणिक विधाते, किशोर डागवाले, बाळासाहेब भुजबळ, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक सुरेश बनसोडे, दत्ता गाडळकर, प्रकाश भागानगरे, सुजाता पडोळे, सौ. रुपाली दातरंगे, संदीप दातरंगे, सौ.सुनंदाताई भुजबळ, पंडितराव खरपुडे, ज्ञानेश्वर रासकर, संजय खामकर, राजेंद्र पडोळे, विनोद पुंड, मनेष साठे, गोरख पडोळे, विष्णुपंत म्हस्के, डॉ. रणजीत सत्रे, अवधूत फुलसौंदर, राजेंद्र ताठे, प्रा. शिवाजी विधाते, आनंद पुंड, रोहित पठारे, रामदास फुले, ब्रिजेश ताठे, चंद्रकांत पुंड, मच्छिंद्र बनकर, कॅप्टन सुधीर पुंड, माऊली गायकवाड, अनिल इवळे, रमेश चिपाडे, ज्ञानदेव खराडे, संजय ताजणे, डॉ. दामोधर कळमकर, ॲड. गाडेकर, ॲड. अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सर्वत्र महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन होत असून, त्यांच्या विचाराने एकत्र येत आहे. महात्मा फुले व सावित्रीबार्इ फुले यांच्या स्मारकाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा झालेला असून, लवकरच महात्मा फुले व सावित्रीबार्इ फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी चांगल्या पध्दतीने काम सुरु होणार असल्याची खात्री महापालिका आयुक्तांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्रांती केली. शिक्षणची शक्ती त्यांनी जाणल्यामुळे बहुजन समाजासह महिलांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नाने महिलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. मुलींसाठी शाळा काढून स्त्री सक्षमीकरणाचा पाया त्यांनी रोवला. त्यांचे विचार जीवंत ठेऊन सर्व समाजाला प्रेरणा व स्फुर्ती देण्यासाठी शहरात उभे राहत असलेले महात्मा फुले यांचे नियोजित स्मारक दिशा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
