बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार
लवकरच जिल्हाव्यापी मेळावा; राहुरी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याचे संकेत
जाती-धर्मात भांडण लावण्याचे राजकारण सुरू असल्याने पक्षाची जबाबदारी अधिक वाढली -सुशांत म्हस्के
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाची शहरातील महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के व महिला आघाडीच्या ज्योतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. शहर, उपनगर तसेच नगर तालुक्यातील कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बैठकीत बोलताना सुशांत म्हस्के यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर जुने व नवीन कार्यकर्ते यांचा समन्वय साधत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून संधी देण्यात आली असून, पक्ष हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असून सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन वाटचाल करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन पदाधिकाऱ्यांना एका वर्षाचा कार्यकाळ देण्यात आला असून, त्यांनी प्रभावी काम करून पक्षविस्तार करावा व अधिकाधिक कार्यकर्ते जोडावेत, असे आवाहन करण्यात आले. समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय किंवा अत्याचार झाल्यास पक्ष त्याविरोधात आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले. सध्या जाती-धर्मात भांडण लावण्याचे राजकारण सुरू असून, अशा परिस्थितीत पक्षाची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
लवकरच जिल्हाव्यापी मेळावा आयोजित करण्यात येणार असून, या मेळाव्यासाठी पक्षप्रमुख राजेंद्र गवई उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच युवकांना जिल्ह्यात काम करण्याची मोठी संधी असून, गावागावातील प्रश्न सोडविण्यासाठी युवकांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले. आगामी राहुरी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार देण्यात येणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.
यावेळी दानिश शेख यांनी सांगितले की, आरपीआयच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत काम सुरू आहे. शहरात पक्षाचे कार्य भक्कम झाले असून, चळवळीतील कार्यकर्ते निळ्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. सत्ताधारी राजकारणात जाती-धर्मात भांडणे लावून सोयीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे गोरगरीब जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला आघाडीच्या ज्योतीताई पवार यांनी महिलांच्या विविध प्रश्नांवर पक्षाने सातत्याने आवाज उठविला असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील अनेक प्रकरणांमध्ये महिलांना न्याय मिळवून देण्यात पक्षाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पुढील काळात महिलांचे संघटन अधिक मजबूत करून त्यांच्या प्रश्नांवर काम केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीत शहर जिल्हा कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, युवक शहराध्यक्ष विजय शिरसाठ, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नईम शेख, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अजीम खान, नगर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, भिंगार शहराध्यक्ष स्वप्निल साठे, अल्पसंख्यांक शहर जिल्हा कार्याध्यक्ष मुस्तफा शेख, शहर सचिव विनीत पाडळे, युवक आघाडी शहर जिल्हा कार्याध्यक्ष लकी वाघमारे, युवक शहराध्यक्ष उमेश गायकवाड, नगर तालुका युवक अध्यक्ष विपुल भोसले, तालुका युवक कार्याध्यक्ष रोहित थोरात, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जमीर शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष हर्षल जाधव, शहर उपाध्यक्ष निजाम शेख, अरबाज शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विकास पटेकर, शहर उपाध्यक्ष जावेद सय्यद, हुसेन चौधरी, अमोल चव्हाण, युवराज कंडारे, कायदा सल्लागार आघाडी शहर जिल्हाध्यक्ष आदिल शेख, शहर संघटक आफताब बागवान, शहर उपाध्यक्ष युवक आघाडी योहान चाबुकस्वार, वैद्यकीय आघाडी शहर जिल्हाध्यक्ष इमरान शेख, वाहतूक आघाडी शहर जिल्हा अध्यक्ष निखिल मगर यांची निवड करण्यात आली.
तसेच महिला आघाडीमध्ये शहर उपाध्यक्ष संगीता पाटोळे, खजिनदार मनीषा गायकवाड, तालुका उपाध्यक्ष वैशाली आल्हाट, शहर जिल्हा सचिव प्रमिला पाटोळे, ब्केडगाव उपाध्यक्ष विश्रांती पठारे, शहर संघटक पूजा साठे, नगर तालुका उपाध्यक्ष सोनाली साळवे, शहर जिल्हा उपाध्यक्ष सविता भालेराव, युवती शहराध्यक्ष शितल नाटीकर, शहर जिल्हा कार्याध्यक्ष सारिका साळवे, पारनेर तालुका अध्यक्ष धनश्री चाबुकस्वार यांचीही निवड करण्यात आली.
