शेतकरी कर्जमाफी, बोगस दिव्यांग प्रकरणांवर होणार चर्चा; प्रहारची पुढील दिशा स्पष्ट होणार
प्रहार करिअर अकॅडमीच्या नव्या वास्तूचे लोकार्पण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगरमध्ये 29 व 30 मार्च रोजी शेतकरी व दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, बोगस दिव्यांग प्रकरणे तसेच दिव्यांगांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रहार संघटनेचे राज्य अभियानप्रमुख महेश बडे, जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, उद्योजक संतोष पवार, विजय भंडारी व तुकाराम शिंगटे यांनी सविस्तर माहिती दिली.
रविवार (दि. 29 मार्च) रोजी सकाळी 9 वाजता इमामपूर (ता. नगर, संभाजीनगर रस्ता) येथील प्रहार करिअर अकॅडमीच्या नवीन वास्तूमध्ये मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या दिवशी लेखक विकास लवांडे, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे आणि व्यंकटेश कल्याणकर यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
तसेच, दुपारी 1 ते 2 या वेळेत ज्येष्ठ पत्रकार विलास बडे हे बच्चू कडू यांची मुलाखत घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी (दि. 30 मार्च) राहुल गिरी आणि प्रा. विजय नवले यांची व्याख्याने होणार असून, दुपारी 12 ते 1 या वेळेत ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांच्याकडून बच्चू कडू यांची मुलाखत घेतली जाणार आहे.
शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत अनेक जाचक अटी असल्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा मुद्दा या मेळाव्यात मांडला जाणार आहे. तसेच, राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग कर्मचारी आढळून येत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जाणार आहे.
या सर्व मुद्द्यांवर बच्चू कडू आपली स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हमीभाव आणि इतर प्रश्नांवर 6 जून रोजी पुणे ते मुंबई दरम्यान लाँग मार्च काढण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. या मेळाव्यात चार ते पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून, प्रहार संघटनेची राजकीय भूमिका व आगामी वाटचाल यावेळी स्पष्ट केली जाणार आहे. तसेच भविष्यातील शेतकरी आंदोलनाचे शिस्तबद्ध नियोजनही या मेळाव्यात ठरविण्यात येणार आहे. एकूणच, हा मेळावा शेतकरी व दिव्यांगांच्या प्रश्नांवर निर्णायक चर्चा घडवून आणणारा ठरणार असून, प्रहार संघटनेच्या पुढील धोरणाची दिशा स्पष्ट करणारा ठरणार आहे.
करिअर अकॅडमीचे लोकार्पण
माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहार करिअर अकॅडमी व लोकनायक बच्चुभाऊ कडू ज्युनिअर कॉलेजच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी मेस, होस्टेल, वाचनालय आणि प्रशस्त मैदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य, पोलीस व अग्निशामक दलातील भरतीसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सर्व प्रशिक्षण कोर्स पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून, मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
