• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

नगरचे भूषण पैलवान तवकलभाई वस्ताद

ByMirror

Mar 21, 2026
सर्वधर्म समभावाचा आदर्श जपणारे व्यक्तिमत्त्व

सर्वधर्म समभावाचा आदर्श जपणारे व्यक्तिमत्त्व


रमजान महिन्यातील पुण्यतिथीनिमित्त नगरकरांकडून स्मरण; कुस्ती, समाजकार्य आणि शांततेसाठी आयुष्य अर्पण

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगरच्या क्रीडा, सामाजिक आणि सांप्रदायिक ऐक्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेले प्रसिद्ध पैलवान तवकलभाई सुलतानभाई वस्ताद यांची रमजान महिन्यातील पुण्यतिथी निमित्ताने नगरकरांकडून स्मरण करण्यात येत आहे. सर्वधर्म समभावाची परंपरा जपत कुस्ती, व्यायाम आणि समाजसेवा यांचा संगम घडविणारे तवकल वस्ताद हे खऱ्या अर्थाने नगरचे भूषण मानले जातात.


मजबूत शरीरयष्टी, कसलेला व्यायाम आणि कुस्तीतील पराक्रम यामुळे तवकल वस्ताद यांचे नाव महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातही प्रसिद्ध झाले होते. पहाटे चार वाजल्यापासून धावणे, तालमीत जोर-बैठका, मोगड्या फिरविणे, लाल मातीचा हौद खणणे आणि त्यानंतर तालमीतील पट्ट्यांसोबत कुस्तीचा सराव असा त्यांचा कठोर दिनक्रम होता. अनेक नामांकित पैलवानांना हरवून त्यांनी नगरचे नाव राज्यभर गाजविले.


इंदूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी मोठमोठ्या पैलवानांना चितपट केल्याने इंदूरचे महाराज शिवाजीराव होळकर अत्यंत प्रभावित झाले. त्यांच्या भव्य शरीरयष्टीने प्रभावित होऊन महाराजांनी सोन्याच्या मोहऱ्यांची टोपली देत “दोन्ही ओंजळीत जितक्या मोहरा मावतील तितक्या घेऊन जा” अशी भेट दिली. नगरला परतल्यानंतर नागरिकांनी रेल्वे स्थानकावर त्यांचे जल्लोषात स्वागत करून शहरातून मिरवणूक काढली. त्या सोन्याच्या पैशातून त्यांनी वडील सुलतान वस्ताद यांच्या तालमीचे नूतनीकरण केले तसेच मशिदीच्या बांधकामासाठी आणि गरजूंसाठीही मदत केली.


सन 1946 मध्ये माळीवाडा धर्मशाळेत त्यांनी विविध तालमी व सामाजिक संस्थांना एकत्र आणून “तालीम संघ व शांतता कमिटी”ची स्थापना केली. हिंदू-मुस्लिम समाजाने एकत्र येऊन परिसरात शांतता राखावी, बंधुभाव वाढवावा आणि समाजात सलोखा टिकवावा, असा संदेश या कमिटीच्या माध्यमातून देण्यात आला.


भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही नगरमधील विविध धर्मीय स्वातंत्र्यसैनिकांबरोबर तवकल वस्ताद सहभागी झाले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी नगरमध्ये काढण्यात आलेल्या मशाल मिरवणुकीत त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. तसेच नगरच्या कापड बाजारात लागलेल्या आगीच्या वेळी तालमीतील व्यायामपटूंची मानवी साखळी तयार करून आग विझविण्यासाठी त्यांनी धाडसी मदत केली. 1952 च्या दुष्काळात पिंपळगाव तलावासाठी झालेल्या श्रमदानातही त्यांनी तालमीतील तरुणांना सहभागी करून मोठे योगदान दिले.


अहमदनगर नगरपालिकेचे लोकनियुक्त सभासद म्हणून ते सन 1924 ते 1946 या काळात बिनविरोध निवडून आले होते. शहरात हिंदू-मुस्लिम सलोखा टिकविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.


दि. 17 मे 1954 रोजी रमजान महिन्यातील 13 व्या रोजी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. अखेरच्या काळातही मशिदीची रंगरंगोटी व्हावी म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. कुस्ती, व्यायाम, समाजकार्य आणि सांप्रदायिक ऐक्य यांचा आदर्श घालून देणारे तवकलभाई सुलतानभाई वस्ताद हे नगरच्या सामाजिक इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून आजही स्मरणात आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *