• Tue. Mar 3rd, 2026

अहमदनगर उर्दू हायस्कूल ॲण्ड मिसगर जुनिअर कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

ByMirror

Mar 3, 2026

104 प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण; विद्यार्थ्यांची कल्पकता ठरली केंद्रस्थानी


विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढून नव्या कल्पनांना चालना मिळते -प्रा. युनुस शेख

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सी.व्ही. रमन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या वतीने मिसगर जुनिअर कॉलेज, अहमदनगर उर्दू प्राथमिक शाळा, उर्दू हायस्कूल व ऐम इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मिसगर लायब्ररी येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले.
या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील आयडिल शाळा, फकीरवाडा प्राथमिक शाळा आणि दर्गादायरा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही विविध प्रकल्प सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.


विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. कमलेश गमरे व नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचे अध्यक्ष खान इनामुल्लाह जिक्रीया अहमद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनरल सेक्रेटरी रेहान काझी, खजिनदार वाजिद खान, विश्‍वस्त इफ्तेखार अकील अहमद, अहमदनगर कॉलेजच्या पदार्थ विज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. सोहेल सय्यद, जोशी सर, आर्किटेक्ट मुनज्जर शेख तसेच जामखेड येथील ॲग्लो उर्दू शाळेचे मुख्याध्यापक युनुस शेख सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर जुनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक खान मुनव्वर हुसैन, अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका रुमाना खान तसेच ऐम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका नाजनीन खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.


या प्रदर्शनात एकूण 104 विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. प्रदूषण मुक्ती, पाणी बचत, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, सौर ऊर्जा, बायोगॅस, पर्यावरण संरक्षण, रोबोटिक्स, ज्वालामुखीचे मॉडेल, जलप्रदूषण नियंत्रण, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक व माहितीपूर्ण सादरीकरण केले. विशेष म्हणजे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यावर आधारित प्रकल्प सादर करून आधुनिक तंत्रज्ञानाची झलक दाखवली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या प्रकल्पामागील वैज्ञानिक तत्त्वे आत्मविश्‍वासाने समजावून सांगत उपस्थितांचे मन जिंकले.


प्रा. कमलेश गमरे म्हणाले की, विज्ञान ही केवळ विषयाची मर्यादा नसून ती विचार करण्याची पद्धत आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्‍न विचारण्याची सवय लावली तरच संशोधनाची बीजे रोवली जातील. आज येथे सादर झालेले प्रकल्प हे केवळ शालेय उपक्रम नसून उद्याचे वैज्ञानिक घडविण्याचे पाऊल आहे.”


प्रा. युनुस शेख म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन व व्यासपीठ मिळाल्यास ते जागतिक पातळीवर आपली छाप सोडू शकतात. अशा विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढतो आणि नव्या कल्पनांना चालना मिळते.


मुख्याध्यापक खान मुनव्वर हुसैन म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होते. अशा उपक्रमांमुळे त्यांची सर्जनशीलता, आत्मविश्‍वास आणि समस्या सोडविण्याची क्षमता वाढते. आमच्या संस्थेचा उद्देश केवळ शैक्षणिक प्रगती नसून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रदर्शनातील प्रकल्पांचे परीक्षण प्राध्यापक घमरे सर, प्राध्यापक के. डी. जोशी आणि प्राध्यापक नदीम सर यांनी केले. उत्कृष्ट प्रकल्पांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मिसगर जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य अझर खान, प्रा. रियाझ, अहमदनगर उर्दू हायस्कूलचे मुशेब सर तसेच ऐम स्कूलचे शाहनवाज पटेल यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


या प्रदर्शनासाठी जिल्हा परिषद उर्दू शाळा दर्गादायराच्या मुख्याध्यापिका रंगरेज नसीम इब्राहिम, जिल्हा परिषद उर्दू शाळा फकीरवाडाच्या मुख्याध्यापिका अंजुम ए. गफुर शेख मॅडम, दिलशाद मुसा शेख, सुमय्या मोहसीन पठाण, आदर्श उर्दू शाळा आनंदनगर येथील शेख यास्मिन ए. कादिर आणि आयडियल उर्दू स्कूल मुकुंदनगर येथील सय्यद रेश्‍मा यासीन उपस्थित होत्या.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाहनवाज पटेल, अझहर खान, रियाज शेख, जफर शेख, अफ्फान तांबटकर, मुसैब शेख, नदीम सय्यद तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *