मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर नागरी सहकारी बँकांसाठी कर्जवसुली व्यवस्थापन प्रशिक्षण; अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचा उपक्रम
‘कायद्याचे शस्त्र आणि मानवी दृष्टिकोन’ यांचा समतोल साधण्याचा संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर्ज वसुली ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून ती एक कला आहे. कायद्याचे शस्त्र हातात ठेवून, समोरच्या व्यक्तीची परिस्थिती व भावना समजून घेत आणि आवश्यकतेनुसार तडजोडीची भूमिका स्वीकारत वसुली केल्यास अधिक परिणामकारक यश मिळते, असे प्रतिपादन बारामती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी नवनाथ जगताप यांनी केले.
अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या वतीने मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांकडून सामंजस्याच्या भूमिकेतून प्रभावी कर्ज वसुली व्हावी यासाठी ‘कर्जवसुली व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जगताप बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन कोपरगाव पीपल्स बँकेचे चेअरमन सुनील बंब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा, अंबिका महिला बँकेच्या संचालिका आशाताई मिश्किल, संध्याताई जाधव तसेच जिल्ह्यातील विविध नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आपल्या मार्गदर्शनात नवनाथ जगताप यांनी कर्जदारांचे तीन प्रकार स्पष्ट केले. क्षमता आहे, पण इच्छा नाही अशा कर्जदारांना कायद्याचा धाक दाखवून कर्जफेडीची मानसिकता तयार करावी लागते. इच्छा आहे, पण क्षमता नाही हे कर्जदार अडचणीत आलेले असतात. त्यांची परिस्थिती समजून तडजोडीची भूमिका घ्यावी लागते. ना इच्छा, ना क्षमता अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया, जप्ती आणि लिलाव करून वसुली करावी लागते.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत सहकारी बँकांना कर्ज वसुलीसाठी प्रभावी अधिकार प्राप्त झाले आहेत. या कायद्यातील तरतुदींचा योग्य वापर केल्यास बँकांची थकबाकी कमी होण्यास मदत होते. जमीनदार व महसूल प्रशासनाच्या माध्यमातूनही चांगली वसुली साधता येते. मात्र, वसुली करताना समोरच्या व्यक्तीच्या भावना व परिस्थिती लक्षात घेतल्यास प्रक्रिया अधिक सुलभ होते, असे त्यांनी नमूद केले.
असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “मार्च एण्ड हा बँकिंग क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. थकबाकी कमी करणे, आर्थिक शिस्त राखणे आणि बँकेचा ताळेबंद मजबूत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र कर्ज वसुली करताना कर्जदार आणि वसुली अधिकारी यांच्यातील वाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शिस्तबद्ध, संवेदनशील आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धात्मक वातावरणात सहकारी बँकांनी व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी सक्षम झाले, तर वसुलीची प्रक्रिया अधिक परिणामकारक व सुसंवादी होईल. याच उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुनील बंब म्हणाले की, सहकारी बँका या ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. कर्जवाटप जितके महत्त्वाचे, तितकीच कर्ज वसुलीही महत्त्वाची आहे. बँकांची आर्थिक शिस्त राखण्यासाठी सक्षम वसुली व्यवस्थापन आवश्यक आहे. कायद्याचे ज्ञान, संवाद कौशल्य आणि मानवी दृष्टिकोन या त्रिसूत्रीवर आधारित वसुलीच यशस्वी ठरते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपली कौशल्ये वाढविली, तर बँकांची पत अधिक बळकट होईल. जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले.
