• Tue. Mar 3rd, 2026

महापुरुषांच्या अवमानप्रकरणी हरजितसिंह वधवा यांची तक्रार

ByMirror

Mar 3, 2026

मंत्रालयाकडून ‘तत्काळ’ दखल; मिलन बॅन्क्वेट हॉल प्रकरण


प्रशासकीय पातळीवर चौकशीला सुरुवात

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरियाणा राज्यातील मिलन बॅन्क्वेट हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा वापर स्वच्छतागृह दर्शक (टॉयलेट साइनबोर्ड) म्हणून करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांचा अशा प्रकारे अवमान झाल्याचा आरोप करत शहरातील सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांनी संबंधित प्रकरणी औपचारिक तक्रार दाखल केली आहे.


माहितीनुसार, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित बॅन्क्वेट हॉलमध्ये स्वच्छतागृह दर्शविण्यासाठी शिवराय आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये सोशल मीडियाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणी हरजितसिंह वधवा यांनी पुढाकार घेऊन हरियाणा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालय, सांस्कृतिक कार्य विभाग आणि गृह विभाग यांना ई-मेलद्वारे तक्रार नोंदविली आहे.

तक्रारीत संबंधित घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र यांनी या तक्रारीची अधिकृत दखल घेत ती संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविल्याची माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांनी तक्रार प्राप्त झाल्याची नोंद करून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे कळविण्यात आले आहे.


पुढील टप्प्यात महाराष्ट्र शासन गृह विभाग यांनीही सदर प्रकरण ‘तत्काळ’ म्हणून चिन्हांकित करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे आवश्‍यक ती कारवाई करण्यासाठी पाठविले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत हरजितसिंह वधवा यांनी सांगितले की, प्रशासकीय पातळीवर विषय गांभीर्याने घेतला गेला असून पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. जरी हरियाणा पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिसाद प्राप्त झालेला नसला तरी राज्यस्तरावर या विषयाची दखल घेतली गेल्यामुळे प्रकरणाला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.


या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर केवळ सोशल मीडियावर भावना व्यक्त करण्यापेक्षा संवैधानिक व कायदेशीर मार्गाने तक्रार केल्यास शासन यंत्रणा दखल घेते आणि कार्यवाहीची प्रक्रिया सुरू होते, हे या प्रकरणातून स्पष्ट झाल्याचे मत वधवा यांनी व्यक्त केले. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित प्रशासनाने वस्तुस्थितीची पडताळणी करून योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *