अहमदनगर (प्रतिनिधी)- नालेगाव येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शोभा चव्हाण-गोयर (वय 67 वर्षे ) यांचे नुकतेच निधन झाले. त्या वाल्मीक समाजातील पहिल्या महिला पोलीस होत्या. त्यांचे शिक्षण उर्दू भाषेत चाँद सुलताना हायस्कूल मध्ये झाले होते. त्यांना उर्दू, हिंदी, मराठी व इंग्रजी भाषा अवगत होत्या.
त्यांचा स्वभाव धार्मिक व मनमिळावू असल्याने त्या सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांचे पती नारायण चव्हाण पुणे येथील लष्कराच्या सदन कमांड या ठिकाणी ऑडिट ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी आहे. महाराष्ट्र पोलीस मध्ये 1983 साली भरती होऊन त्यांनी राहुरी या ठिकाणाहून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पोलीस खात्यात त्यांनी प्रमाणिकपणे सेवा बजावली. दरोडे, खून आदी महत्त्वाच्या खटल्याच्या तपासात त्यांची कामगिरी चांगली राहिली. त्यांनी शिर्डी, कोपरगाव, भिंगार कॅम्प, तालुका पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय या ठिकाणी सेवा दिली. तपासकामी त्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जीव धोक्यात घालून हैदराबाद, केरळ, गुजरात पर्यंत गेल्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.