• Wed. Feb 18th, 2026

विधाते विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटेबद्दल मार्गदर्शन

ByMirror

Feb 18, 2026

बोर्ड परीक्षांसाठी शुभेच्छा देऊन निरोप


कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि शिस्त बाळगल्यास यश निश्‍चित -प्राचार्य सुनिल पंडीत

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी शुभेच्छा देत निरोप देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शनपर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दहावीनंतर कोणत्या शाखांची निवड करावी, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, तांत्रिक प्रशिक्षण, तसेच पुढील शैक्षणिक दिशा कशी ठरवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनिल पंडीत उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष सुसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संजय कदम,यांच्यासह शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.तसेच धर्मनाथ विद्यालय वडगाव तांदळी चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे हे यांनी दहावीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला 1 हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले.


मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, कला या पारंपरिक शाखांबरोबरच आयटीआय, पॉलिटेक्निक, पॅरामेडिकल, कृषी, संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा, लघुउद्योग प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांचा विचार करून योग्य दिशा निवडावी, असे आवाहन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्‍वास आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व पटवून दिले.


प्राचार्य सुनिल पंडीत म्हणाले की, “विद्यार्थ्यांनो, आयुष्यात मोठे ध्येय ठेवा. ध्येय स्पष्ट असेल तर त्याकडे वाटचाल करणे सोपे होते. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि शिस्त या तीन गोष्टी अंगी बाळगल्यास यश निश्‍चित मिळते. अपयश आले तरी खचून जाऊ नका; तेच यशाची पहिली पायरी असते.”


प्रा. शिवाजीराव विधाते म्हणाले की, “माणूस त्याच्या उंचीने किंवा परिस्थितीने मोठा होत नाही, तर कर्तृत्वाने मोठा ठरतो. आपल्या कष्टांवर विश्‍वास ठेवा. गाव, कुटुंब आणि शाळेचे नाव उज्ज्वल करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. शिक्षण हेच खरे भांडवल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सचिन बर्डे यांनी करून दिला. यावेळी रोशनी गोपाळघरे व प्रिया साठे या विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे जीवनाला योग्य दिशा मिळाल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मेहेत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब पुंड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *